पुलाची शिरोली / वार्ताहर
कासारवाडी ( ता. हातकणंगले ) येथे दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे ठार झाले. अनिल बाबुराव वरूटे ( वय ४१, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले ) व नारायण मडके ( वय ३८, रा. मादळे, ता. करवीर ) अशी मृतांची नावे आहेत. सादळे- कासारवाडी घाटाच्या पायथ्याशी कुरण नावाच्या शिवाराजवळ सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, अनिल वरुटे हे सादळे येथील एका फार्म हाऊसवर काम करतात. तेथेच त्यांनी रसवंतीचा गाडा सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा आपले काम आटोपून ते मोटारसायकलवरून कासारवाडी येथे आपल्या घरी येत होते. सादळे – कासारवाडी घाट उतारावरती कुरूण नावाच्या शेताजवळ सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलची नारायण मडके यांच्या विशेष मोटारसायकलीस जोराची धडक बसली. नारायण मडके हे दिव्यांग आहेत. ते त्यांच्या विशेष प्रकारच्या मोटारसायकलवरून कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. ते परत येत असताना वरुटे यांच्या मोटारसायकलची धडक बसली. ही धडक प्रचंड वेगाची आणि जोराची होती. यामध्ये मडके व वरुटे या दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. दरम्यान काही नागरीकांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली. जखमींवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. पण डॉक्टरांनी दोघा जखमींचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा करून नोंद घेण्याचे काम सुरू होते