बेळगाव : हेस्कॉमकडून टेम्पररी मीटरसाठी दोन महिन्यांचे डिपॉझिट एकाचवेळी जमा करून घेतले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाचवेळी 9 हजार ऊपये मोजावे लागत आहेत. टेम्पररी कनेक्शनसाठी एकाचवेळी मोठी रक्कम भरावी लागत असल्यामुळे घरबांधणी करताना विजेसाठीच अधिक खर्च करावा लागत आहे. हेस्कॉमकडून अॅडव्हान्स कंझम्शन चार्जच्या नावाखाली यापूर्वी 28 दिवसांसाठी 4 हजार 200 ऊपये जमा करून घेतले जात होते. परंतु या महिन्यापासून 60 दिवसांसाठी 9 हजार ऊपये डिपॉझिट भरून घेतले जात आहे. यामुळे टेम्पररी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना एकाच महिन्यात वाढीव बोजा उचलावा लागत आहे. घरबांधणीसाठी प्रत्येक ग्राहकाला टेम्पररी कनेक्शन सक्तीचे करण्यात आल्याने नवीन ग्राहकांना या नियमाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
टेम्पररी मीटरसाठी शेकडो अर्ज
हेस्कॉमकडून नवनवे नियम लावून ग्राहकांकडून दंडवसुलीचा सपाटा लावण्यात आला आहे. अशातच आता दोन महिन्यांचे अॅडव्हान्स चार्जीस एकाचवेळी भरून घेतले जात आहे. बेळगाव शहरांतर्गत दररोज शेकडो अर्ज टेम्पररी मीटरसाठी येत असतात. त्यामुळे या सर्वांनाच 9 हजार ऊपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. हे पैसे नंतर परत मिळणार असले तरी पहिल्याच वेळी इतकी मोठी रक्कम भरताना ग्राहकांची दमछाक होत आहे.
भरलेली रक्कम ग्राहकांना पुन्हा मिळणार
ग्राहकांच्या सोयीसाठी दोन महिन्यांचे अॅडव्हान्स कन्झम्शन चार्जीस एकाचवेळी भरून घेतले जात आहेत. भरलेली रक्कम ग्राहकांना पुन्हा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-विनोद केरूर (साहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)