यू-23 वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत नीतेश, विकास यांनी मिळविली पदके
वृत्तसंस्था /पाँटेवेद्रा, स्पेन
यू-23 वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय मल्लांनी विजयी घोडदौड पुढे चालू ठेवताना ग्रीको रोमन विभागात आणखी दोन कांस्यपदके पटकावत नवा इतिहास रचला. भारताची एकूण तीन कांस्यपदके झाली आहेत.
नीतेशने 97 किलो वजन गटात ब्राझीलच्या इगोर फर्नांडो अल्वेस डी क्वीरोझिनचा पराभव करून कांस्यपदक पटकावले. नीतेशने या लढतीत पूर्ण वर्चस्व राखत 10-0 असा एकतर्फी विजय मिळविला. त्याआधी कांस्यपदकासाठी झालेल्या 72 किलो वजन गटातील अन्य एका लढतीत भारताच्या विकासने जपानच्या दिएगो कोबायाशीवर 6-0 अशी मात केली. या स्पर्धेत ग्रीको रोमनमध्ये भारताने तीन पदके प्रथमच जिंकली आहेत. आदल्या दिवशी साजन भनवालाने भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले होते.
भारताने या स्पर्धेसाठी एकूण 30 सदस्य निवडले होते. पण त्यापैकी फक्त 9 जणांनाच व्हिसा प्राप्त झाल्याने या स्पर्धेत सहभागी होता आले. उर्वरित 21 जणांना स्पेनच्या एम्बसीने व्हिसा नाकारल्याने ते या स्पर्धेत सहभागी होऊ शकलेले नाहीत.