ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Two Naxalites arrested in Gadchiroli गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ बळकट करण्याच्या हेतूने रेकी करण्यासाठी आलेल्या दोन जहाल नक्षल्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
कृष्णा उर्फ सनिराम शामलाल नरोटे (वय 24) आणि समुराम घसेन नरोटे (22) (दोघेही रा. मोरचूल) अशी अटक करण्यात आलेल्या दोन नक्षलवाद्यांची नावे आहेत.
अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात 2 संशयित व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अधिक चौकशी केली असता ते नक्षलवादी असल्याचे समजले. कृष्णा उर्फ सनिराम हा 2015 मध्ये टिपागड दलमध्ये भरती झाला. त्यानंतर नक्षल नेता जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून त्याने काम केले. त्यानंतर 2020 पर्यंत तो नक्षल्यांसोबत सक्रिय होता. शासनाने त्याच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. समुराम नरोटे हा नक्षल्यांच्या जनमिलिशियाचा सदस्य होता. त्याच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस होते. दोन्ही नक्षल्यांवर खून, जाळपोळ, चकमक असे अनेक गुन्हे दाखल होते.
सद्य:स्थितीत उत्तर गडचिरोलीत नक्षल चळवळ संपुष्टात आली आहे. त्याअनुषंगाने अबुझमाडमधील नक्षल्यांच्या नेत्यांनी अटकेतील दोन्ही नेत्यांसह काही जणांना रेकी करण्यासाठी उत्तर गडचिरोलीत पाठविले होते. अटक करण्यात आलेले दोन्ही नक्षली नक्षल चळवळ बळकट करण्यासाठी पडताळणी करत होते. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी धानोरा तालुक्यातील मोरचूल परिसरातून अटक केली.