सातारा : प्रतिनिधी
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाका येथे एसटी आणि कारची घासाघीस झाली होती. एसटी चालकास मारहाण करणाऱ्या दोघांना जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी पाच साक्षीदार तपासले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुईज पोलीस ठाण्यात दि. ११ डिसेंबर २०१८ रोजी ११.४५ वाजणेचे सुमारास यतील कोरेगाव डेपोचे एसटी चालक युवराज हणमंत बर्गे ( वय ४८ वर्ष, रा.मार्केट यार्ड पाठीमागे कोरेगाव ता.कोरेगाव) यांनी स्वारगेट पुणे येथुन कोरेगाव येथे एसटी घेवून येत असताना आकाश बाळासो कामटे (वय २३ वर्ष रा. सोनोरी (सासवड) ता. पुरंदर जि. पुणे), स्वप्निल बाळोसो जैनक (वय २५ वर्ष रा. भिवडी ता. पुरंदर जि. पुणे) यांनी बर्गे हे एसटी घेवुन विरमाडे ता. वाई गांवचे हद्दीत आनेवाडी टोलनाका पुणे लेनवर टोल भरण्यासाठी थांबले असताना अचानक डाव्या बाजुने एक काळ्या रंगाची स्वीफ्ट कार ही टोलनाक्याच्या लेनमध्ये आली. बसच्या बिजागरीमध्ये स्वीफट कारचा बंपर अडकलेच्या कारणावरुन कारमधील दोघांनी बर्गे यांना ‘तु गाडी व्यवस्थीत चालवली नाहीस, तुला समजत नाही’ असे म्हणुन शिवीगाळ केली व एसटीमध्ये चढुन हाताने, लाथाबुक्यांनी तोंडावर पाठीत मारहाण केली. तसेच पोटात लाथा घातल्या व एस. टी. बसची चावी काढुन ते तेथुन पळून गेले.
घडलेला प्रकार सहकारी वाहक शितल निलेश पवार यांनी तसेच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पाहीला व भांडणे सोडवली. याची फिर्याद एस.टी.चालक युवराज हणमंत बर्गे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहा. पो. निरीक्षक बी. आर. भरणे यांनी करुन न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते. हा खटला २ रे अति, जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता फेरोज शेख यांनी खटल्याचे कामकाज पाहीले. या केसमध्ये एकुण ०५ साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राहय मानुन न्यायाधीश यांनी दोघांना यास भा.द.वि.स.क.३५३ अन्वये १ वर्ष साधा कारावास व प्रत्येकी रुपये १० हजार दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद व भा.द.वि.स.क.३२३ अन्वये १ महिना साधा कारावास व पाचशे रुपये दंड, दंड न दिलेस ७ दिवस साधी कैद अशी शिक्षा दिली आहे.
वाईच्या डीवाय एसपी डॉ. श्रीमती शितल जानवे-खराडे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधीकारी म्हणून भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अरुण निळे यांनी कामकाज पाहिले.