जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोपातही उपस्थिती
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील दोन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणार आहे. पेडणे तालुक्यातील मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच तालुक्यातील धारगळ येथील आयुष इस्पितळ प्रक्लपाचा त्यात समावेश आहे. तसेच 8 डिसेंबरपासून सुरु होणाऱया जागतिक आयुर्वेद परिषेदच्या 11 रोजीच होणाऱया समारोप सोहळय़ातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
याच दिवशी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ उनानी मेडिसिन प्रकल्प आणि दिल्ली येथे उभारण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ होमिओपॅथी इमारत या दोन प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान गोव्यातूनच व्हर्चुअल पध्दतीने करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काल सोमवारी विधानसभा संकुलातील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. त्यांच्या सोबत मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल उपस्थित होते.
मोपा अंातरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी 2016 साली झाली होती. जीएमआर गोवा इंटरनॅशनल कंपनीकडे काम सोपविले होते. विमानतळाच्या पहिल्या टप्यातील काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. 2870 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून विमानतळ प्रत्यक्षात सुरु झाल्यानंतर सरकारला 36.99 टक्के महसूल वाटा मिळणार आहे.
आत्तापर्यंत विमानतळावर 1250 स्थानिक युवकांना नोकऱया देण्यात आल्या आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून दर सहा महिन्यात 200 युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. विमानतळाच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की नाव देण्याचा निर्णय केंद्रीय हवाई मंत्रालयाचा असून गोवा सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. मोपा विमानतळ सुरु झाला तरी दाबोळी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसाठी खुला रहाणार असल्याचेही मुख्यमत्र्यांनी सांगितले.
धारगळ आयुष इस्पितळाचे उद्घाटन
धारगळ येथे 304 कोटी 26 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आयुष इस्पितळाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तत्कालीन आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी हा प्रकल्प गोव्यात आणला होता. कोविड काळात त्याचे काम रखडले होते, मात्र आता हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. या इस्पितळाच्या पॅम्पसमध्ये हॉस्टेलची सोय असून 210 अंडर ग्रॅज्युएट व 56 पोस्ट गॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय असेल. ऑल इंडिया इन्स्टिटय़ुट ऑफ आयुर्वेद धारगळ येथील इस्पितळ एकूण 50 एकर जमिनीत सामाविले आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आयुर्वेद परिषदेत पाच हजार प्रतिनिधी
8 डिसेंबरपासून गोव्यात सुरु होणाऱया जागतिक आयुर्वेद परिषेदचा समारोप सोहळा 11 रोजी होणार आहे. आयुर्वेद परिषदेसाठी पाच हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. 30 देशातील 200 विदेशी प्रतिनिधी आहेत. जागतिक आयुर्वेद परिषद पणजीत दरबार हॉल, राजभवन, कला अकादमी तसेच बांदोडकर मैदान अशा विविध ठिकाणी होणार आहे. 150 वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. 450 संशोधन पेपर सादर केले जातील. 600 पेपर प्रदर्शित केले जातील. जगभरातील 200 कंपनी आपली उत्पादने 400 स्टॉल्समधून प्रदर्शित करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.