गुजरातमध्ये कारवाई ः गोळीबारानंतर ग्रेनेड हल्ल्याचेही होते नियोजन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी शार्पशूटर प्रियवर्त फौजी आणि कशिश यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही आपला तिसरा साथीदार केशवसोबत गुजरातमधील मुंद्रा बंदराजवळ भाडय़ाच्या घरात लपून बसले होते. फौजी हा हरियाणातील सोनीपत जिह्यातील गढी सिसाना येथील रहिवासी आहे. तो संपूर्ण हत्याकांडाचे नेतृत्व करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, कशिश उर्फ कुलदीप हा हरियाणातील बेरी-झज्जर येथील रहिवासी आहे. त्यांचा आणखी एक साथीदार केशव हा भटिंडा येथील आवा-बस्तीमधील रहिवासी आहे.
मुसेवालाच्या हत्येत एकूण 6 शार्पशूटर्सचा सहभाग असल्याचेही दिल्ली पोलिसांनी उघड केले आहे. सर्व शार्पशूटर्स बोलेरो गाडीतून घटनास्थळी आले होते. तसेच शस्त्र निकामी झाल्यास किंवा घटनास्थळी कोणताही धोका असल्यास मुसेवाला यांच्यावर ग्रेनेड हल्ल्याची योजनाही शार्प शूटर्सनी आखली होती, असेही दिल्ली पोलिसांनी उघड केले. मुसेवालाच्या हत्येनंतर या शार्पशूटर्सनी गोल्डी ब्रारला फोन करून काम पूर्ण झाल्याचे सांगितले होते.
मुसेवालाच्या हत्येसाठी 2 मॉडय़ूल सक्रिय होते. दोघेही कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारच्या संपर्कात होते. कशिश बोलेरोचे सारथ्य करत होता. त्याच गाडीमध्ये प्रियवर्त फौजी हा रायफलसह सुसज्ज होता. फौजी याच्या दिमतीला अंकित सेरसा आणि दीपक मुंडी अन्य दोघे शार्पशूटर्सही देण्यात आले होते. अन्य एका वाहनामध्ये जगरूप रूपा कोरोला कार चालवत होता. त्याच्यासोबत मनप्रीत मन्नू बसला होता, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे विशेष पोलीस आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी सांगितले.