- दिवसभर चौकशी, 80 लाख लुट प्रकरण
- रक्कम हवालाची असल्याचा संशय
प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Crime News : इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन चौघा भामट्यांनी सांगलीच्या सोनाराची 80 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी रविवारी दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे दिवसभर कसुन चौकशी करण्यात आली. दरम्यान चोरीस गेलेली रक्कम हवालाची असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, धनाजी मगर हे सराफ व्यावसायिक आहेत. त्यांचे नागाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सोन्याचे दुकान आहे. 17 रोजी ते कोल्हापुरात वसुलीसाठी आले होते. वसुली झालेल्या पैशातून ते सोने खरेदी करुन जाणार होते. गांधीनगर येथील मित्र संतोष कुकरेजा याच्याकडून 80 लाख रुपयांची रक्कम घेऊन ते बुधवारी रात्री गंगावेश येथे निघाले होते. दरम्यान त्यांना आणखी काही रक्कम एक व्यापारी ताराराणी पुतळ्याजवळ देणार होता. याच दरम्यान मुक्तसैनिक परिसरातून मगर यांच्याकडील 80 लाख रुपये चौघांनी लुटले. दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणने सुरु केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गांधीनगरमधील दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना घटनास्थळी फिरवल्याची माहितीही समोर आली आहे.
अधिक वाचण्यासाठी – Ratnagiri : दुचाकी अपघातात काळबादेवीचा तरुण ठार
रक्कम हवालाची
दरम्यान लुटलेली 80 लाख रुपयांची रक्कम ही हवालाची असल्याची माहिती समोर आली आहे. गांधीनगर येथील एका व्यापाऱयाकडून ही रक्कम घेवून धनाजी मगर हे गंगावेश येथील एका व्यापाऱ्यास देण्यासाठी निघाले होते. दरम्यान चोरीस गेलेली रक्कमही 1 कोटी रुपयांच्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.