Tarun Bharat

दोन वेळचे चॅम्पियन विंडीज स्पर्धेबाहेर

टी-20 विश्वचषक : आयर्लंडकडून 9 गडय़ांनी एकतर्फी  पराभवाचा धक्का, स्टर्लिंगचे नाबाद अर्धशतक, डेलॅनी सामनावीर

वृत्तसंस्था /होबार्ट

आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याचे माजी विजेत्या बलाढय़ विंडीज संघाचे स्वप्न शुक्रवारच्या सामन्यातील आयर्लंडकडून झालेल्या पराभवामुळे उद्ध्वस्त झाले. शुक्रवारी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील ‘ब’ गटातील सामन्यात आयर्लंडने विंडीजचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. 3 बळी मिळविणाऱया आयर्लंडच्या गॅरेथ डेलॅनीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीज संघाने 20 षटकात 5 बाद 146 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडने 17.3 षटकात 1 बाद 150 धावा जमवित दणदणीत विजय नोंदविला.

विंडीजच्या डावामध्ये ब्रेन्डॉन किंगने 48 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 62, चार्ल्सने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, कर्णधार पूरनने 1 षटकारासह 13, ओडेन स्मिथने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 19 धावा जमविल्या. पॉवेल 6 धावांवर तर मेयर्स एका धावेवर बाद झाले. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे गॅरेथ डेलॅनी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 16 धावात 3 तर मॅकार्थी आणि सिमी सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ओडेन स्मिथ आणि किंग या विंडीजच्या जोडीने शेवटच्या 3 षटकात 34 धावा जमविल्याने विंडीजला 146 धावांपर्यंत मजल मारता आली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडचा कर्णधार बलबिर्नी आणि पॉल स्टर्लिंग या सलामीच्या जोडीने डावाला दणकेबाज सुरुवात करून देताना 7.3 षटकात 73 धावांची भागीदारी केली. अकील हुसेनने बलबिर्नीला झेलबाद केले. त्याने 23 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. स्टर्लिंग आणि टकेर या जोडीने दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 77 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला पंधरा चेंडू बाकी ठेवून 9 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवून दिला. स्टर्लिंगने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 66 तर टकेरने 35 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 45 धावा झोडपल्या. आयर्लंडच्या डावात 7 षटकार आणि 12 चौकार नेंदविले गेले. विंडीजतर्फे अकिल हुसेनने 38 धावात 1 गडी बाद केला. आयर्लंडच्या फलंदाजांनी अकिल हुसेनच्या एका षटकात 16 धावा घेतल्या. पॉल स्टर्लिंगने डावातील 12 व्या षटकात आपले अर्धशतक 32 चेंडूत नोंदविले. या पराभवामुळे टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर-12 संघामध्ये स्थान मिळविण्याचे विंडीजचे आव्हान संपुष्टात आले.

संक्षिप्त धावफलक

विंडीज 20 षटकात 5 बाद 146 (किंग नाबाद 62, चार्ल्स 24, लेविस 13, पूरन 13, स्मिथ नाबाद 19, डेलॅनी 3-16, मॅकार्थी 1-33, सिमी सिंग 1-11), आयर्लंड 17.3 षटकात 1 बाद 150 (स्टर्लिंग नाबाद 66, बलबिर्नी 37, टकेर नाबाद 45, अकिल हुसेन 1-38).

स्कॉटलंडला नमवून झिम्बाब्वे सुपर-12 फेरीत दाखल

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिम्बाब्वेने सुपर-12 संघामध्ये आपले स्थान निश्चित केले. शुक्रवारी ‘ब’ गटातील प्राथमिक फेरीच्या सामन्यात झिम्बाब्वेने स्कॉटलंडचा 5 गडय़ांनी पराभव केला.
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये झिम्बाब्वेचा संघ पहिल्यांदाच सुपर-12 संघात प्रवेश करता झाला आहे. झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 20 षटकात 6 बाद 132 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेने 18.3 षटकात 5 बाद 133 धावा जमवित हा सामना 9 चेंडू बाकी ठेवून 5 गडय़ांनी जिंकत रविवारपासून सुरू होणाऱया सुपर 12 फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

स्कॉटलंडच्या डावामध्ये सलामीच्या जॉर्ज मुन्सेने 51 चेंडूत 7 चौकारांसह 54, कर्णधार बेरिंग्टनने 13,
मॅक्लीऑडने 26 चेंडूत 1 चौकारासह 25, लियास्कने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. स्कॉटलंडच्या डावात 11 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे चतारा आणि एन्गरेव्हा यांनी प्रत्येकी 2 तर मुझारबनी आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावामध्ये कर्णधार एर्विनने 54 चेंडूत 6 चौकारांसह 58 तर सिकंदर रझाने 23 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 40, शुंभाने नाबाद 11 धावा जमविल्या. चकबवा 4, सिन विल्यम्स 7 धावांवर बाद झाले. बर्लने नाबाद 9 धावा केल्या. मधेवेरेला आपले खाते उघडता आले नाही. आयर्लंडतर्फे डेव्हीने 16 धावात 2 तर व्हिल, वेट आणि लिसेक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. झिम्बाब्वेचा कर्णधार एर्विन आणि सिकंदर रझाने उत्तुंग फटके मारण्यावर अधिक भर दिला होता. झिम्बाब्वेची 8 व्या षटकात स्थिती 3 बाद 42 अशी होती. त्यानंतर एर्विन आणि सिकंदर रझा यांनी 4 थ्या गडय़ासाठी 6 षटकात 64 धावांची भागीदारी केली. झिम्बाब्वेला शेवटच्या 10 षटकात विजयासाठी 78 धावांची जरुरी होती. स्कॉटलंडच्या वॅटने कर्णधार एर्विनचा बळी घेऊन सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. पण झिम्बाब्वेच्या बर्लने संयमी फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेला शेवटच्या 2 षटकात विजयासाठी केवळ 6 धावांची जरुरी होती. शुंभा आणि बर्ल यांनी शेरीफच्या पहिल्या दोन चेंडूवर 2 धावा घेतल्या. त्यानंतर तिसऱया चेंडूवर बर्लने विजयी चौकार ठोकला.

संक्षिप्त धावफलक

स्कॉटलंड 20 षटकात 6 बाद 132 (मुन्से  54, बेरिंग्टन 13, मॅक्लीऑड 25, लियास्क 12, चतारा 2-14, एन्गरेव्हा 2-28, मुझारबनी 1-34, सिकंदर रझा 1-20), झिम्बाब्वे 18.3 षटकात 5 बाद 133 (चकबवा 4, एर्विन 58, सिकंदर रझा 40, शुंभा नाबाद 11, बर्ल नाबाद 9, डेव्ही 2-16, व्हिल, वॅट, लियास्क प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

कोनेरु हंपीला 12 वे स्थान

Patil_p

बार्सिलोना स्पर्धेत नदाल उपांत्य फेरीत

Patil_p

प्रसंगी ब्रॉड किंवा अँडरसनलाही वगळले जाईल

Patil_p

आयओएची पहिली महिला अध्यक्ष पी. टी. उषा

Patil_p

पाटणा पायरेट्स, हरियाना स्टीलर्स विजयी

Patil_p

‘टेबलटॉपर्स’ गुजरातला पंजाब किंग्सने लोळवले!

Patil_p