डब्याला लागली आग
वृत्तसंस्था ऍमस्टरडॅम
नेदरलँड्समध्ये मंगळवारी एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. येथे एका मालगाडीशी टक्कर झाल्यावर प्रवासी रेल्वे रुळावरून घसरली आहे. या रेल्वेमधून किमान 50 जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे अन् मालगाडीत टक्कर झाल्यावर काही डब्यांनी पेट घेतल्याने स्थिती अधिकच गंभीर झाल्याचे स्थानिक आपत्कालीन सेवेच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
रेल्वे लीडेन शहरातून हेगच्या दिशेने प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली आहे. मालगाडीशी टक्कर झाल्यावर रेल्वेचा एक डबा रुळावरून घसरत उलटला आहे. तर मागील डब्याला आग लागली होती, अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले आहे. लीडेन आणि हेगदरम्यान वूर्सचोटेन गावानजीक दुर्घटनास्थळी बचाव पथक पोहोचले आहे. दुर्घटनेमुळे लीडेन आणि हेगच्या काही हिस्स्यांदरम्यान रेल्वेसेवा रोखण्यात आल्याचे डच रेल्वेकडून सांगण्यात आले.