प्रतिनिधी /खानापूर
येथील शिव राजा छत्रपती चौकात उसाने भरलेली ट्रक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. तरीही सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळला.
याबाबतची माहिती अशी, मल्लाप्पा पाटील यांच्या मालकीचा ट्रक्टर तोलगी येथून ऊस भरून लैला साखर कारखान्याला चालला होता. राजा छत्रपती चौकात आल्यावर रस्त्यावर पडलेल्या मोठय़ा खड्डय़ांमुळे ट्रक्टरच्या मागील पहिली ट्रॉली खड्डय़ात गेल्याने पलटी झाली. यावेळी रस्त्याशेजारी थांबलेला केए 27 एम 9703 या बोलेरोवर ट्रॉलीतील ऊस पडल्याने बोलेरोचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मारुती ओम्नी (केए 22 पी 1334) कारचेही नुकसान झाले आहे. बोलेरो मालक सुनील बरगुकर रा. देवलती हे आपल्या मित्रासह बोलेरो वाहन काही वेळापूर्वी रस्त्याच्या कडेला थांबवून तेथून बाजुला झाले होते. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
या रस्त्यावरील वाहतूक एकीकडून सुरू झाली असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. राजा टाइल्स ते गोवा क्रॉसपर्यंत जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने या तीन किलोमीटरच्या अंतरावर वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत.
नागरिकांतून संताप
काही दिवसांपूर्वीच गोवा क्रॉसजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. यानंतरही या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी संबंधित खात्याकडून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पुढील तीन महिने उसाची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होणार आहे. यासाठी संबंधित खात्याकडून खबरदारी घेतली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. रस्त्यावरील पलटी झालेला ट्रक्टरची ट्रॉली सोमवारी सकाळी काढण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.