प्रतिनिधी /पेडणे
भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पेडणे व्हायकाऊंट हायस्कूल, आयुष हॉस्पिटल ते मोपा विमानतळ प्रकल्पप्पर्यंत भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली.
या रॅलीचे उद्घाटन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पेडणे भाजप मंडळाध्यक्ष तथा चांदेल सरपंच तुळशीदास गावस, युवा मोर्चाचे अध्यक्ष अभिजित शेटय़े, धारगळ सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, मोपा उपसरपंच सुबोध महाले, माजी जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक मनोज हरमलकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, धारगळ सुकेकुळण येथे मांदे मतदारसंघातील भाजप युवा मोर्चानेही रॅलीत सहभाग घेतला. रॅली धारगळ आयुष हॉस्पिटलजवळ पोहोचल्यानंतर त्याठिकाणी पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, गोवा प्रदेश युवा भाजपचे अध्यक्ष समीर मांदेकर आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांच्या सरकारच्या कारकिर्दीत राज्यात राबविलेल्या प्रकल्पांचे दर्शन युवाशक्तीला व्हावे, यासाठीच दुचाकी युवाशक्ती रॅली काढल्याची माहिती आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली. भाजप सरकारतर्फे चौफेर विकास चालू आहे. युवाशक्तीला त्याची जाणीव व्हावी, यासाठी रॅलीचे आयोजन केल्याचे सिद्धार्थ कुंकळकर म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालुक्यात आणलेल्या प्रकल्पांचे दर्शन युवकांना व्हावे, यासाठी ही रॅली आयोजित केल्याचे गोवा प्रदेश भाजप युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांदेकर यांनी सांगितले.