दोन वर्षांच्या कालावधीनंतर दुचाकीला अच्छे दिन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील दोन वर्षांच्या विक्रीतील घसरणीमुळे दुचाकी उद्योगाला चालू वर्षातील दुसऱया सहामाहीत विक्री वाढीसह मजबुती प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अशी स्थिती निर्माण होण्यामागे काही कारणे आहेत. आर्थिक स्थितीमधील सुधारणा, चांगला मान्सून, कृषी क्षेत्रातील वाढीव उत्पन्न, शैक्षणिक संस्था सुरु होणे ही कारणे सांगितली जात आहेत. यासह विविध प्रकारचे सण-उत्सव आगामी काळात येणार असल्याने दुचाकी विक्रीत तेजी राहण्याचे संकेत अभ्यासकांनी वर्तवले आहेत.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (एफएडीए) यांच्या सर्वेक्षणानुसार जास्तीत जास्त 50.3 टक्के डिलर्सनी विक्रीमध्ये वाढ राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षांमध्ये दुसऱया सहामाहीत म्हणजेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत 66 ते 67 लाख दुचाकींची विक्री झाली होती. चालू वर्षातील दुसऱया सहामाहीतील विक्रीचा आकडा 70 ते 75 लाख पर्यंत पोहचणार असल्याची शक्यता मांडली आहे.
वर्षाच्या आधारे दुचाकी विक्री मजबूत
वर्ष 2019 मध्ये दुचाकीची विक्री ही सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती, परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे एकूण विक्रीसोबत दुचाकीची विक्री ही मोठय़ा प्रमाणात प्रभावीत होत गेल्याचे दिसून आले. यामध्ये वर्षाच्या आधारे पाहता वाहन विक्रीत एप्रिलनंतर सुधारणात्मक स्थिती दिसून आली आहे. हे वाहन विक्रीसाठी आगामी काळासाठी शुभसंकेत मानले जात आहेत.
नवीन लाँचिंगची संख्या वाढणार
मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात वाहन कंपन्या जास्तीत जास्त नवीन वाहनांचे लाँचिंग करण्यावर भर देणार आहेत, असेही सांगितले जात आहे. मागील सणासुदीचे दिवस कोरोना महामारीच्या दबावात गेले असून चालू वर्षातील विक्री अधिक वाढणार असल्याचेही फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी यावेळी सांगितले आहे.