घनदाट जंगलातून पाचव्या दिवशी मिळाली सुखरूप
वार्ताहर / कणकुंबी
चापोली गावच्या मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम, सर्व ग्रामस्थ मंदिराकडे जाण्यासाठी आपापल्या तयारीत, अशामध्ये दोन वर्षाची मुलगी सकाळी घरातून अचानक गायब होते आणि एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार रात्री घनदाट जंगलात राहते. आणि पाचव्या दिवशी सुखरूप मिळते, हा चमत्कारच म्हणावा लागेल!
मंगळवार दि. 26 एप्रिल रोजी सकाळी घरातून चिरेखाणी गवळीवाडा चापोली येथून गायब झालेली आदिती शिवाजी हणबर (वय 2), मूळ गाव तावरकट्टी, ही मुसळधार पाऊस, जंगली श्वापदांचा वावर असलेल्या घनदाट जंगलात चार दिवस राहिली आणि पाचव्या दिवशी म्हणजेच शनिवार दि. 30 रोजी सकाळी साडेनऊ वाजता सुखरूप सापडली.
याबाबतचे वृत्त असे की चापोली येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिराचा उद्घाटन समारंभ सोमवार आणि मंगळवार रोजी संपन्न झाला. चापोलीच्या गवळी वाडय़ावरील वसंत हणबर यांची मुलगी सुनीता शिवाजी हणबर राहणार तावरकट्टी ही आपल्या माहेरी कार्यक्रमासाठी आली होती. सोमवारी मंदिराचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारी मंदिराचा उद्घाटन समारंभ आणि दुपारी महाप्रसाद असा मोठा कार्यक्रम होता. मंदिराकडे जाण्यासाठी सर्वांची घाई गडबड, तावरकट्टीहून आलेली सुनीता हणबर उर्फ इटगेकर आपल्या दोन वर्षाच्या मुलीला तयार करून मंदिराकडे जाण्याची तयारी करत होती. अशावेळी अचानकपणे मुलगी घरातून गायब झाली. त्यानंतर ठिकठिकाणी तिचा शोध घेण्यात आला. मंगळवारी सकाळी मुलगी गायब झाली. त्यादिवशी आणि पुन्हा बुधवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसातसुद्धा शोधाशोध केली. परंतु तिचा ठावठिकाणा लागला नाही. पुन्हा गुरुवारी आणि शुक्रवारी चापोली परिसरातील जंगलात सर्वत्र शोध घेतला. परंतु अपयश आले. चार दिवस गवळीवाडय़ावरील नागरिकांनी व तिच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. शेवटी सर्वांना खात्री झाली की चार दिवस मुलगी सापडली नाही म्हणजे तिचे काहीतरी बरेवाईट झाले असणार. घनदाट जंगलात अन्नपाणी नसताना चार-पाच दिवस दोन वर्षांची मुलगी सुखरूप मिळेल, याची शाश्वती कुणालाही नव्हती. चापोली गावापासून एक किलोमीटर अंतरावर वाराचे झरू या ठिकाणी पाचव्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता सापडली. गावातील एक व्यक्ती त्या ठिकाणी जवळून जात असताना एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्या ठिकाणी जाऊन मुलीला शोधून घरी आणले. मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. लहान असल्याने तिला व्यवस्थित बोलता येत नव्हते. चार-पाच दिवसांमध्ये डासांनी चावल्याने तिच्या शरीरावर वर्ण दिसत होते. सध्या ती सुखरुप असून गावामध्ये मात्र ती गायब झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. घनदाट जंगलात जंगली श्वापदांचा राजरोसपणे वावर असलेल्या ठिकाणी मुलगी सुखरूप मिळते, हा चमत्कारच म्हणावा लागेल!