हुबळी पोलिसांकडून दोघांना अटक : गुन्हय़ासाठी वापरलेली कारही जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथील गोकुळ रोड पोलिसांनी चेनस्नॅचिंगप्रकरणी अटक केलेल्या बेळगावच्या दोन तरुणांनी कोल्हापूर व गडहिंग्लज येथेही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी हुबळी पोलिसांनी गुन्हय़ासाठी वापरलेली एक कार ताब्यात घेतली आहे.
नितेश ऊर्फ दीपू जगन्नाथ ढापळे (वय 32) रा. रुक्मिणीनगर, रोहित ऊर्फ पिल्ल्या शंकर (वय 22) रा. टिळकवाडी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. 18 जून रोजी गोकुळ रोड पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी या जोडगोळीला अटक केली होती. त्यावेळी चार गुन्हय़ांची त्यांनी कबुली दिली होती.
बेळगाव येथून मोटारसायकलची चोरी करून त्याचा वापर चेनस्नॅचिंगसाठी करण्यात आला आहे. 7 जून रोजी दुपारी कोल्हापूर येथील जोतिबा रोड परिसरात मेवेकर ऍण्ड सन्स या दुकानाजवळ आशा श्रीकांत भोसले (वय 57) रा. कापडे गल्ली, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलजवळ, कोल्हापूर यांच्या गळय़ातील सोनसाखळी हिसकावून घेऊन मोटारसायकलवरून आलेला हेल्मेटधारी तरुण पळाला होता.
हा प्रकारही या जोडगोळीतील एकाने केल्याचे उघडकीस येताच शुक्रवारी जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी कोल्हापूरला भेट देऊन यासंबंधी माहिती घेतली. गुन्हय़ासाठी वापरलेली केए 22, एमए 0232 क्रमांकाची कारही पोलिसांनी जप्त केली आहे.