Tarun Bharat

बालिंगा रोडवर अपघातात चिंचवडेचे दोन तरुण ठार

दुचाकी-ट्रकचा अपघातः मृत चिंचवडेचे : कोल्हापुरातील काम आटोपून गावाकडे जाताना काळाचा घाला

प्रतिनिधी/कोल्हापूर

फुलेवाडी ते बालिंगा रोडवर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. एस. आर. पेट्रोल पंपजवळ रात्री पावणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातातील दोघे मृत चिंचवडे (ता. करवीर) गावचे आहेत. विकास संभाजी तोरस्कर (वय 20) आणि ऋषिकेश राजाराम कांबळे (वय 19) त्यांची नावे आहेत. कामानिमित्त ते कोल्हापुरात आले होते. गावाकडे परतताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. दुसऱया दुचाकीला ओव्हरटेक करत असताना विकास आणि ऋषिकेश यांची दुचाकी समोरून येणाऱया ट्रकला धडकल्याने हा अपघात घडल्याची चर्चा अपघातस्थळी होती. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात गावातील दोन तरुण मृत पावल्याने चिंचवडेवर शोककळा पसरली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चिंचवडे येथील विकास तोरस्कर आणि ऋषिकेश कांबळे हे दोघे कामानिमित्त शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. रात्री ते काम आटोपून दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात होते. फुलेवाडी जवळ असलेल्या एस. आर. पेट्रोल पंपाजवळ आले असता दुचाकी आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. रस्त्यावरील अन्य एका दुचाकीला ओव्हरटेक करताना विकास आणि ऋषिकेशची दुचाकी समोरून येणाऱया ट्रकवर जाऊन धडकल्याने ही दुर्घटना घडल्याची अपघातस्थळी चर्चा होती. या अपघातात विकास तोरस्कर जागीच ठार झाला. तर ऋषिकेश कांबळे गंभीर जखमी झाला. दोघांना फुलेवाडीतील अग्निशमन दलाच्या गाडीतून सीपीआरमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी विकासला मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यु झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चिंचवडे गावातील मृतांच्या नातेवाईकांसह शेकडो तरुणांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. विकास आणि ऋषिकेशच्या वडिलांना त्यांचे नातेवाईक धीर देत होते.

चिंचवडेवर शोककळा
ऋषिकेश कांबळे हा कुडित्रेतील श्रीराम कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील राजाराम कांबळे शेती करतात. विकास तोरस्करही शिक्षण घेत होता. दोघेही सर्वसामान्य कुटुंबाचे आधार होते. त्यांच्या अपघाती मृत्युने कांबळे, तोरस्कर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर ऐन गणेशोत्सवात गावातील दोन तरुण मृत पावल्याने चिंचवडेवर शोककळा पसरली आहे.

हर्षल सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तप्तरता
अपघात घडला त्या ठिकाणाहून शिवसेनेचे शहर समन्वयक हर्षल सुर्वे आणि त्यांचे सहकारी मित्र जात होते. त्यांनी तातडीने रूग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला फोन करून अपघाताची माहिती दिली. फुलेवाडीतील अग्निशमन दलाची गाडी तत्काळ अपघातस्थळी आली. विकास आणि ऋषिकेश यांना त्या गाडीतून सीपीआरमध्ये नेण्यात आले.

Related Stories

Kolhapur : मामाच्या निधनाच्या नैराश्यातून भाचीची गळफास लावून आत्महत्या

Abhijeet Khandekar

जिल्हा आरोग्य सक्षमीकरणासाठी प्रशासनाला उद्योजकांनी मदतीचा हात द्यावा

Archana Banage

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी साखर कारखान्यावर कारवाई

Archana Banage

जिल्हा परिषदेचे पेन्शनर वाऱ्यावर

Archana Banage

पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजार रुपये दागिने लंपास

Abhijeet Khandekar

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दोन कृषी केंद्रांवर कारवाई

Archana Banage