प्रतिनिधी /फोंडा
फोंडा-पणजी महामार्गावर कोने-प्रियोळ येथे दुचाकी व टुरिस्ट प्रवासी बसच्या झालेल्या धडकेत कर्नाटक येथील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे. काल रविवारी सायं. 6 वा. सुमारास हा अपघात घडला. कर्नाटकातील दोघां जखमीची ओळख अद्याप पटलेली नाही.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी केए 63 एस 3269 केटीएमने दोघे युवक पणजीहून फोंडय़ाचे दिशेने येत होते. तर टुरिस्ट प्रवासी बस जीए 06 टी 7430 फोंडय़ाहून मुंबईकडे रवाना झाली होती. कोने प्रियोळ पाटयेकडे पोचले असता गेंधळलेल्या दुचाकीचालकाने सरळ धडक बसला दिली. यात दुचाकीचालकासह पाठिमागे बसलेला गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीचालाकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पाठीमागे बसलेल्याच्या पायाला दुखापत झाली. जखमीना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळातून बांबोळी येथील गोमेकॉत हलविण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून याप्रकरणी बसचालक साईबन्ना बिमन्ना गुलबर्ग कर्नाटक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी हवालदार अजित गावकर अधिक तपास करीत आहे.