अटल सेतूवरील अपघातात पोलीस कॉन्स्टेबल मृत्युमुखी
\
पर्वरी / माशेल (प्रतिनिधी)
राज्यात शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळय़ा अपघातात दोन युवक ठार झाले. मांडवी नदीवरील अटल सेतूवर झालेल्या अपघातात एक पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला, तर आमोणा पुलाजवळील अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, मांडवी नदीवरील अटल सेतूवर शनिवारी संध्याकाळी सहा वा. टेम्पो (जीए 03 एन 7869) आणि स्वीफ्ट कार (जीए 07 ई 7729) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात स्वीफ्ट कारचालक पोलीस कॉन्स्टेबल संदीप नाईक (वय 32, मेरशी) याचा घटनास्थळी मृत्यू झाला. टेम्पो चालक धीरजकुमार (बिहार) यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत संदीप नाईक हा हणजूण पोलीस स्थानकात काम करत होता. अटल सेतूवर यापूर्वी अनेक छोटेमोठे अपघात झाले होते. पण कोणाचाही बळी गेला नव्हता. कालचा हा पहिला बळी आहे.
या संबंधीचे सविस्तर वृत्त असे की, शनिवारी संध्याकाळी 6 वा. संदीप नाईक हा आपली स्वीफ्ट कार घेऊन अटल सेतूवरुन पणजीला जात होता. उच्च न्यायालय इमारतीजवळ पोहचला असता संदीपचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने रस्ता विभाजकाला जोराची ठोकर दिली. नंतर गाडी विभाजक ओलांडून दुसऱया बाजूला पडली. त्याचवेळी पणजीहून म्हापसा येथे जाणाऱया टेम्पोची त्याला समोरासमोर धडक बसली. त्यात संदीपचे जागीच निधन झाले. टेम्पो चालक धीरजकुमार यालाही जबरदस्त दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे.