कुडचडे पालिकेच्या नवीन कार्यालयीन इमारतीच्या दर्जाविषयी सवाल
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत नुकत्याच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून वापरात आणलेल्या कुडचडे-काकोडा पालिकेच्या नवीन कार्यालयीन इमारतीच्या मुख्य दरवाजासमोरच्या छपराच्या पीओपीचे तुकडे पहिल्याच पावसात खाली पडल्यामुळे स्थानिक लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदर इमारतीचे काम पूर्ण करून अवघे काही महिने पूर्ण झालेले आहेत. त्यात अजून सदर इमारतीचा अंदाजे 80 टक्के भाग वापरात यायचा आहे. त्याअगोदरच नवीन इमारत दुरुस्तीच्या गरजेचे संकेत देऊ लागल्यामुळे सदर इमारतीचे काम चांगल्या दर्जाचे झाले नसल्याचे उघड होते, अशा प्रतिक्रिया लोकांमधून उमटू लागल्या आहेत. कोटय़वधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली इमारत अवघ्या एका वर्षात अशा स्थितीत दिसू लागली, तर पुढे काय, असा सवाल लोकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. लवकरच कुडचडे नगराध्यक्ष व नगरसेवकांना बसण्यासाठी आणखी एक खास इमारत बांधण्याचे कंत्राट सरकारकडून निघणार की काय अशाही उपहासात्मक प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.