313 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सरकतेय चक्रीवादळ ः चीन अन् जपानला मोठा धोका
वृत्तसंस्था / टोकियो
हिनामनोर हे चालू वर्षातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका चीन अन् जपानला आहे. हे चक्रीवादळ पूर्व चीन समुद्राच्या पार आणि जपानच्या दक्षिण भागाला नुकसान पोहोचवू शकते. हिनामनोर चक्रीवादळाने आता 313 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठला आहे. या तीव्रतेमुळे लाटांची उंची आता 15 मीटरपर्यंत पोहोचली आहे. आगामी दिवसांमध्ये याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे.
याचा वेग पाहता हिनामनोर हे चालू वर्षातील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता हे चक्रीवादळ जपानच्या ओकिनावापासून 230 किलोमीटर अंतरावर पूर्वेच्या दिशेने होते. हे चक्रीवादळ रयूकू बेटाच्या दिशेने सरकण्याची अधिक शक्यता आहे.
आगामी दिवसांमध्ये चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. 70 वर्षांपेक्षा अधिक काळात केवळ दोनवेळाच ऑगस्ट महिन्यात इतके शक्तिशाली चक्रीवादळ धडकले आहे. पहिले चक्रीवादळ 1961 आणि तर दुसरे चक्रीवादळ 1997 मध्ये धडकले होते.