सोशल मीडियावर व्हीलचेअरवरील फोटो व्हायरल
मियामी / वृत्तसंस्था
एकेकाळी जागतिक मुष्टियुद्धात साम्राज्य गाजवणाऱया माईक टायसनचे मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअरवरील फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल झाले असून यामुळे त्याच्या तब्येतीविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. टायसन सध्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त असून न्यूयॉर्कमध्ये त्याला स्टीक घेऊन चालावे लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठीची दुखापत चिघळू नये, यासाठी त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे.
56 वर्षीय माईक टायसनने 2005 मध्ये केव्हिन मॅकब्राईडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर मुष्टियुद्धातून निवृत्ती जाहीर केली. नंतर 2020 मध्ये एका प्रदर्शनीय लढतीत त्याने भाग घेतला. रॉय जोन्स ज्युनियरविरुद्धची ती लढत अनिर्णीत राहिली होती. आपली एक्स्पायरी डेट जवळ आली, असे भावूक प्रतिपादन अलीकडेच केले असल्याने चाहत्यांना त्याच्या तब्येतीविषयी चिंता जाणवत आली आहे.