वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जमशेदपूरमधील शिबीर आटोपल्यानंतर भारताचा यू-17 महिला फुटबॉल संघ इटली व नॉर्वेकडे प्रयाण करणार आहे. 20 जून ते 8 जुलै या कालावधीत हा संघ तेथे दोन स्पर्धांत भाग घेणार असून भारतातच होणाऱया फिफा यू-17 महिला विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱयात युवा महिला संघ इटलीमध्ये 22 ते 26 जून या कालावधीत सहाव्या टॉर्नेव महिला फुटबॉल स्पर्धेत भाग घेईल. त्यानंतर 1 ते 7 जुलै या कालावधीत नॉर्वेतील ओपन नॉर्डिक यू-16 महिला फुटबॉल स्पर्धेत सहभागी होईल. नॉर्डिक स्पर्धेत भाग घेण्याची भारताची ही पहिलीच वेळ असेल. इटलीतील स्पर्धेत 22 जून रोजी भारताची सलामीची लढत यजमान इटलीविरुद्ध होईल. भारताशिवाय या स्पर्धेत चिली, इटली, मेक्सिको यांचाही सहभाग आहे. नॉर्वेतील स्पर्धेत एकूण आठ संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यात नेदरलँड्स, नॉर्वे, आईसलँड, डेन्मार्क, फॅरो आयलँड्स, फिनलँड, स्वीडन यांचा समावेश आहे. भारताची सलामीची लढत 1 जुलै रोजी नेदरलँड्सविरुद्ध होईल. प्रमुख प्रशिक्षक थॉमस डेनरबाय यांनी या दौऱयासाठी 23 खेळाडूंची निवड केली आहे. भारतीय यू-17 संघ ः गोलरक्षिका-मोनालिसा देवी, हेमप्रिया सेरम, कीशम मेलोडी चानू. बचावफळी-अस्तम ओराओन, काजल, भूमिका माने, नकेता, पूर्णिमा कुमारी, शुभांगी सिंग, सुधा अंकिता तिर्की, वर्षिका. मध्यफळी-बबिना देवी, ग्लॅडीस झोनुनसंगी, मिशा भंडारी, पिंकू देवी, नीतू लिंडा, शैलजा. आघाडीफळी-अनिता कुमारी, काजोल डिसोझा, नेहा, रेजिया देवी लैशराम, शेलिया देवी, लींडा कोम सेर्टो