भारताची- अमेरिकेविरुद्ध सलामी, मोरोक्को-ब्राझील, न्यूझीलंड-चिली, जर्मनी-नायजेरिया अन्य लढती
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आज मंगळवारपासून येथे फिफा यू-17 महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत असून यजमान भारतीय महिलांचा सलामीचा सामना बलाढय़ अमेरिकेशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या दिवशी एकूण चार सामने होणार असून स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना सायंकाळी 4.30 वाजता ब्राझील व मोरोक्को यांच्यात होणार आहे.
इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघ काहीसा कमकुवत असल्याने अंडरडॉग्स म्हणूनच ते ओळखले जातील. यजमान संघ असल्याने भारताला या स्पर्धेत आपोआप पात्रता मिळाली असून या स्पर्धेत पदार्पण करणाऱया तीनपैकी भारतीय संघ एक आहे. मोरोक्को व टांझानिया हे पदार्पण करणारे अन्य दोन संघ आहेत. या स्पर्धेत भारताचा अ गटात समावेश असून याच गटात ब्राझील, मोरोक्को व अमेरिका यांचाही समावेश आहे. ‘यजमान संघाविरुद्ध गोल नोंदवणे प्रतिस्पर्ध्याला सोपे जाणार नसल्याने बलाढय़ अमेरिकेविरुद्ध आपला संघ एक गुण मिळविण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास भारतासाठी ती मोठी अचीव्हमेंट ठरेल,’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबाय यांनी म्हटले आहे. कलिंगा स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
कॉन्कॅकॅफ चॅम्पियनशिप जिंकून अमेरिकन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला असून विजयाने या स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. भारताविरुद्ध गाफील राहणे त्यांना महाग पडू शकते याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. कारण याच गटात संभाव्य विजेत्या ब्राझीलचाही समावेश आहे. चार गटातील पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकन संघ एकूण पाचव्यांदा व सलग तिसऱयांदा या स्पर्धेत खेळत आहे. मात्र 2008 मध्ये उपविजेतेपद मिळविल्यानंतर त्यांना अद्याप गटसाखळी फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही. ही मालिका खंडित करण्याचा त्यांचा यावेळी प्रयत्न असेल. कॉन्कॅकॅफ स्पर्धेतील 7 सामन्यांत अमेरिकेने तब्बल 58 गोल नोंदवले तर प्रतिस्पर्ध्यांला फक्त एक गोल बहाल केला होता.
डेनरबाय यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली तयारी केली असून इटली, नॉर्वे व स्पेन येथे त्यांनी एक्स्पोजर टूर केले आहेत. युरोपियन व दक्षिण अमेरिकेतील बलवान संघांविरुद्ध त्यांना खेळावयास मिळाले नसले तरी त्यांना थोडाफार अनुभव मिळाला आहे. आपला संघ फिटनेस व बचावामध्ये बराच सुधारला आहे. मात्र आक्रमणात अजून सुधारणा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी मान्य केले. ‘आपल्याविरुद्ध अमेरिकन संघ फेव्हरिट असणार हे निश्चित, पण ते कागदावर. फुटबॉल हे 90, 95 मिनिटे मैदानावर खेळले जाते आणि मैदानावीर कामगिरीच शेवटी निर्णायक ठरते. या लढतीत गुण मिळणार, असे आम्हाला निश्चितपणे वाटते,’ असे डेनरबाय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मोरोक्को-ब्राझील या पहिल्या लढतीशिवाय गट ब मध्ये चिली व न्यूझीलंड यांची लढत मडगावमधील नेहरू स्टेडियमवर सायंकाळी 4.30 वाजता तर जर्मनी व नायजेरिया यांचा सामना त्याच मैदानावर रात्री 8 वाजता खेळविला जाणार आहे. भारताच्या सामन्यांचे प्रक्षेपण स्पोर्ट्स 18, स्पोर्ट्स 18 1 एचडी, स्पोर्ट्स 18 खेल यावर केले जाईल. भारताच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओसिनेमावर केले जाणार आहे.
भारतीय यू-17 महिला संघ ः मोनालिसा देवी मोईरंगथेम, मेलडी चानू कैशाम, अंजली मुंडा, अस्तम ओराओन, नकेता, पूर्णिमा कुमारी, वर्शिका, शिल्की देवी हेमाम, बबिना देवी लिशाम, नीतू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंग, अनिता कुमारी, लींडा कॉम सेर्टो, नेहा, रेजिया देवी लैशराम, शेलिया देवी लॉकटाँगबम, काजोल हय़ुबर्ट डिसोझा, लावण्या उपाध्याय, सुधा अंकिता तिर्की.
सामन्याची वेळ ः रात्री 8 वाजता.