वृत्तसंस्था /बेनोनी
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने स्कॉटलंडचा 83 धावांनी पराभव करत सुपर-6 फेरीमध्ये स्थान मिळविले. या सामन्यात भारतीय संघातील मन्नत कश्यप, अर्चनादेवी आणि सोनम यादव यांची गोलंदाजी प्रभावी ठरली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 4 बाद 149 धावा जमविल्या. त्यानंतर स्कॉटलंडचा डाव 13.1 षटकात 66 धावात आटोपला.
भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील दुसऱया षटकात सलामीची फलंदाज आणि कर्णधार शेफाली वर्मा एका धावेवर बाद झाली. त्यानंतर गोंगाडी त्रिशाने 51 चेंडूत 57 धावा तसेच श्वेता सेहरावतने 10 चेंडूत नाबाद 31 धावा झोडपल्याने भारताला 20 षटकात 4 बाद 149 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या डावामध्ये रिचा घोषने 33 धावांचे योगदान देताना त्रिशासमवेत 70 धावांची भागीदारी केली. स्कॉटलंडतर्फे फ्रेसरने 31 धावात 2 गडी बाद केले. 16.5 षटकात भारताची स्थिती 4 बाद 105 अशी होती. त्यानंतर श्वेता सेहरावतने 2 षटकार आणि 4 चौकारांसह केवळ 10 चेंडूत नाबाद 31 धावा झळकविल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना डार्सी कार्टर आणि अलिसा लिस्टर या सलामीच्या जोडीने स्कॉटलंडच्या डावाला चांगली सुरुवात केली. पहिल्या 5 षटकाअखेर स्कॉटलंडने 1 बाद 40 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर मन्नत कश्यप तसेच अर्चनादेवी व सोनम यादव यांच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा डाव 13.1 षटकात 66 धावात आटोपला. स्कॉटलंडने पहिल्या 10 षटकाअखेर 5 बाद 50 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर त्यांचे उर्वरित 5 गडी 16 धावांच्या मोबदल्यात 3.1 षटकात बाद झाले. मन्नत कश्यपने 12 धावात 4 तसेच अर्चनादेवीने 14 धावात 3 गडी बाद केले. या स्पर्धेत भारताने सलग तीन विजय नोंदवित सुपर-6 गटात प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश असून त्याने तीन सामन्यातून 6 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. भारतीय महिला संघाने यापूर्वी ड गटातील सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात यांचा सलग पराभव केला होता.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 4 बाद 149 (गोंगाडी त्रिशा 57, रिचा घोष 33, श्वेता सेहरावत नाबाद 31, फ्रेसर 2-31), स्कॉटलंड 13.1 षटकात सर्वबाद 66 (कार्टर 24, लिस्टर 14, कश्यप 4-12, अर्चनादेवी 3-14, सोनम यादव 2-1).