बंदुकांच्या दहशतीला आळा बसणार ः वाढत्या गोळीबारांनंतर बायडेन सरकारचे कठोर पाऊल
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेत वारंवार होणाऱया गोळीबारांच्या घटना रोखण्यासाठी अमेरिकन सिनेटमध्ये गन कंट्रोल (बंदूक नियंत्रण) विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाची मागणी अमेरिकेत अनेक दिवसांपासून होत होती. 30 वर्षांत प्रथमच सदर विधेयक पास झाले आहे. अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांबाबत लोक बराच काळ निदर्शने करत होते. सिनेटमध्ये पास झाल्यानंतर आता बंदूक नियंत्रण विधेयक अमेरिकन संसदेत पाठवले जाणार आहे. संसदेत मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची तात्काळ स्वाक्षरी होऊ शकते.
बंदूक नियंत्रण विधेयक अमेरिकन संसदेत मंजूर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. त्यामुळे बायडेन सरकारकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. परंतु संसदेत डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार जास्त असल्याने या विरोधाचा फारसा परिणाम होणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने 65 मते पडली. सर्व 50 डेमोक्रॅट्ससह, 15 रिपब्लिकन प्रतिनिधींनीही विधेयकाच्या बाजूने मतदान केले.
गन कंट्रोल विधेयक मंजूर होऊन कायदा झाल्यावर अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ‘प्यू’ रिसर्च सेंटरच्या एप्रिल 2021 च्या सर्वेक्षणात, जवळपास निम्म्या अमेरिकन लोकांनी बंदुकीची हिंसा, देशासाठी मोठी समस्या असल्याचे मतप्रदर्शन केले होते. तथापि, लोकांना सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगण्याचा अधिकार आहे, या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही अमेरिकेच्या सिनेटमध्ये बंदुकीबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले. एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान अमेरिकन लोकांना बंदुका बाळगण्यास प्रतिबंध केला जाऊ शकत नाही. बंदूक बाळगणे हा अमेरिकनांचा मौलिक अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले होते.
अमेरिकेत शस्त्रास्त्र बाळगण्याचे स्वातंत्र्य
अमेरिकेमध्ये 1791 च्या दुसऱया घटनादुरुस्तीने सर्व नागरिकांना बंदूक बाळगण्याचा अधिकार दिला. अमेरिकेच्या घटनेनुसार, देशाचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी शस्त्रे ठेवणे आणि बाळगणे हा नागरिकांचा अधिकार आहे. यामुळे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक अमेरिकन नागरिकाला (जर तो मानसिक आजारी नसेल तर) स्वतःसोबत बंदूक ठेवण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे.