वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैय्यालाल तेली नामक हिंदू व्यक्तीची निर्घृण हत्या केलेले आरोपी रियाज अख्तरी आणि गौस मोहम्मद यांनी अनेक भाजप नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अन्वेषणात उघड झाली आहे. या कारस्थानाची पाळेमुळे खोलवर असून ती भारताबाहेरही असू शकतात, असे दिसून येत आहे.
कन्हैय्यालाल तेली यांची हत्या शिरच्छेद करून झाली होती. त्यांनी माजी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या प्रेषितांबद्दलच्या विधानाचे समर्थन केल्यामुळे सूड भावनेने त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे. मात्र, या आरोपींचा उद्देश भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांना मारण्याचाही होता. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. तसेच साधनसामग्रीची जुळवाजुळव सुरू केली होती. भाजप नेत्यांवर लक्ष ठेवण्याचेही काम त्यांनी सुरू केले होते, असे तपासात आढळून आल्याने खळबळ उडाली असून एनआयए अधिक तपास करीत आहे.
पाकिस्तानातील संघटनेशी लागेबांधे
दोन आरोपींपैकी अख्तरी याचे संबंध पाकिस्तानस्थित दावत-ए-इस्लामी या दहशतवादी गटाशी असल्याचे स्पष्ट होत आहे. या संघटनेच्या भारतातही शाखा आहेत. या संघटनेचे अनेक हस्तक विविध दहशतवादी कारवायांमध्ये गुंतले असल्याचे दिसून आले आहे. इस्लामचे विरोधक असल्याचे समजून लोकांचा शिरच्छेद करण्याचे विशेष प्रशिक्षण त्यांना देण्यात आले होते. तसेच तशा प्रकारची शस्त्रsही त्यांच्या हाती ठेवण्यात आली होती, असे एनआयएचे म्हणणे आहे.
अल कायदाची पद्धती
शिरच्छेद करून मारण्याची क्रूर मध्ययुगीन पद्धती आयएसआयएस आणि अल कायदा या इस्लामी दहशतवादी संघटनांनी पुनरुज्जीवित केली आहे. तेली यांची हत्याही याच पद्धतीने झाली आहे. त्यामुळे आरोपींचे संबंध दावत-ए-इस्लामी प्रमाणेच अल कायदा आणि आयएसआयएसबरोबर आहेत का? याचा तपास केला जात आहे. भाजप नेत्यांशी जवळीक वाढविण्याचा आरोपींचा प्रयत्न होता.
भाजपशी संबंध जोडण्याचा प्रयत्न
आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत, असा आभास निर्माण करून भाजप नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आरोपींकडून होत होता, असा गौप्यस्फोट भाजपच्या अल्पसंख्य मोर्चाने केला आहे. आरोपींचे भाजप नेत्यांबरोबर असलेले काही फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. काँग्रेसने अशाप्रकारचा एक फोटो प्रसिद्ध करून आरोपी भाजपचेच कार्यकर्ते असल्याचा कांगावा चालविला आहे. तथापि, भाजपशी जवळीक साधण्याचा आरोपींचा उद्देश भाजपचे कार्य करण्याचा नसून नेत्यांची माहिती मिळविण्याचा आणि नंतर त्या माहितीचा उपयोग त्यांची हत्या करण्यासाठी करण्याचा होता, असे तपासात आढळून आले आहे.
झाकीर नाईकच्या सीडी
आरोपींजवळ इस्लामी धर्म प्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांच्या सीडींचा साठा सापडला आहे. झाकीर नाईक याला प्रक्षोभक भाषणे केल्याने आणि धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने देशातून बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्या भाषणांनीच आरोपींना हत्या करण्याची प्रेरणा मिळाल्याचे दिसत आहे. एनआयएने त्या दिशेनेही तपास चालविला आहे.
पाकिस्तानकडून अर्थसाहाय्य
आरोपींना पाकिस्तानकडून अर्थसाहाय्य आणि प्रशिक्षण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. हवालाच्या माध्यमातून त्यांनी पैसा मिळवून तो दहशतवादी कृत्यांसाठी वापरल्याचेही दिसून येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नुपूर शर्मा प्रकरणी अन्य राज्यांमध्येही झालेल्या हत्यांशीही या आरोपींचा संबंध असण्याची शक्मयता आहे.