सातारा : लालमहाल ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, लालमहाल हि वास्तू नाच-गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही, संबधितानी याचं भान ठेवायला हवं होतं. मात्र, या वास्तूत एका लावणीचे चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यांनी हे चित्रीकरण केले आहे ते तात्काळ डिलीट करावे, ते इतरत्र कुठे वापरू नये. तसेच हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
उदयनराजे म्हणाले, खरं तर लालमहाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. मात्र, या ठिकाणी कोणतही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणे गरजेचं आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी.
मुळात ही वास्तू पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात असून या चित्रिकरणासाठी महापालिकेची रितसर परवानगी घेतली आहे का? महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली? तसेच जर परवानगी दिली असेल कर कोणत्या अटी व शर्तींवर परवानगी दिली? याची चौकशी झाली पाहिजे. याच वास्तूत चित्रीकरण करण्याचा नेमका हेतू काय आहे? त्याचबरोबर जे चित्रिकरण झाले असेल ते तपासून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी.