Tarun Bharat

निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी

आ. शिवेंद्रसिंहराजे; विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले

प्रतिनिधी/ सातारा

कास धरण उंची वाढवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे निधी मिळाला. निधी संपल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले त्यावेळीही मी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून अजितदादांच्या सहकार्याने वाढीव निधी मिळवून दिला. आता या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे असताना वाढीव पाईपलाईनचा पत्ताच नाही. त्यामुळे सातारकरांना कासचे वाढीव पाणी फक्त पाहावेच लागणार आहे. याला पालिकेचा नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. आता पालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजे यांची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरु झाली असल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात  हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त पाईपलाईनची सुधारणा व त्याच्याशी निगडीत कामांना निधी मिळण्यासाठी निवेदन दिले. खा. उदयनराजेंच्या या दिल्ली निवेदनावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रक काढून जोरदार टीका केली आहे. गेले पाच- सहा वर्ष पालिकेत मनमानी, नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. टेंडर, टक्केवारी, कमिशन यासाठी एकमेकांचे गळे धरून, मारामाऱया करून पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनविले. पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटण्याचा एककलमी कार्यक्रम पालिकेत सुरु होता. आता निवडणूक आली की, मंजूर नसलेल्या, न होणाऱया आणि दुसऱयाने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे, मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन द्यायचे आणि फोटोसेशन करून सातारकरांना भुलवायचे हे प्रकार जोमाने सुरु झाले आहेत. वास्तविक कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरु झाल्यानंतर पालिकेने वाढीव पाईपलाईन टाकण्याबाबतचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र सातारकरांशी काहीही देणेघेणे नसणाऱया सत्ताधाऱयांना फक्त पैसा आणि पैसा याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.

  सत्तारूढ आघाडीत नगरसेवकांच्या टेंडर, कमिशन आणि टक्केवारीसाठी लागणाऱया कळवंडी सातारकरांना उघडय़ा डोळ्याने पाहायला लागल्या. डीडीटी पावडरच नव्हे तर कचऱयातही पैसे खाण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. भ्रष्टाचारमुक्त कारभार असा डांगोरा पिटून आणि सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष असा दिखावा करून सातारकरांना भावनिक करून पालिकेची सत्ता मिळवली आणि पालिकेचा अक्षरशः बाजार करून टाकला. कुठे आहे सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष? असा सवाल सातारकर वारंवार करीत आहेत. राज्य सरकारने हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागासाठी रस्ते आणि मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी 40 कोटी रुपये मंजूर केले आहेत पण, त्यातही पैसे खायला मिळावेत म्हणून आपल्याच मर्जीतल्या ठेकेदाराला हे काम मिळावे म्हणून या कामाची टेंडरप्रक्रिया रखडवून शहराच्या विकासाला खीळ बसवण्याचे काम सुरु आहे. सातारा पालिकेला अक्षरशः लुटून खाणारे आता निवडणूक आली की, निवेदन आणि फोटोसेशन करून विकासाची खोटी स्वप्ने रंगवत आहेत. वास्तविक ज्यावेळी निधीअभावी कास प्रकल्पाचे काम थांबले होते त्यावेळीच वाढीव पापीपलाईनसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर व्हायला हवा होता. पण, त्यावेळी यांना कशाचेच काहीही देणेघेणे नव्हते, हे आणि प्रशासन झोपा काढत होते. ज्यात पैसे आहेत त्यातच यांना इंटरेस्ट असतो हे सातारकरांना केव्हाच कळून चुकले आहे. पाईपलाईनचे काम मंजूर व्हायला वर्ष लागणार, त्यानंतर काम सुरु होणार आणि पूर्ण कधी होणार? धरणाची उंची वाढली, पाणीसाठाही वाढला पण सातारकरांना वाढीव पाणी मात्र मिळणार नाही हे पाप तुम्ही केले. आता तुमच्या पापाचा घडा भरला असून सुज्ञ सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील, असेही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकात म्हटले आहे.    

Related Stories

जातीनिहाय जनगणना व्हावी; ओबीसी संघटनेची मागणी

datta jadhav

वाईच्या गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडल्याप्रकरणी न्यायालयातून दरोडय़ाचा गुन्हा

Patil_p

”शैक्षणिक गुणवत्ता संपवण्याचा ठाकरे सरकारचा डाव”

Archana Banage

सातारा : गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा रद्द

datta jadhav

सातारा : पालिकेच्या धडक पथकाकडून एका दिवसात दहा हजारांचा दंड वसूल

Archana Banage

कराड तालुक्यात बिबटय़ाची चोरटी शिकार?

Patil_p