Uddhav Thackeray : शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत.या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे,तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल.म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती व लहूशक्तीचा लवकरच मेळावा घेणार आहे,अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.एकीकडं भाजप (BJP) आणि शिंदे गटाची मनसेसोबत (MNS) जवळीक वाढताना दिसत आहे,त्यामुळं या तिन्ही पक्षांची महायुती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यातच आता वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची शिवसेना यांची आघाडी होण्याची शक्यताही आहे.
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या वतीनं वांद्रे येथील शासकीय वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अण्णाभाऊ साठेंनी मर्दुमकीनं शाहिरी केली तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी गिरणी कामगारांना चेतवले आणि पेटवले. मग संघर्ष उभा राहिला. तो संघर्ष तेव्हा उभा राहिला नसता तर आपली मुंबई आपली राहिली नसती.आज लहूशक्ती माझ्यासोबत आहे.तुम्ही माझ्याकडं काही मागण्या केल्या नाहीत,पण हा समाज आतापर्यंत दुर्लक्षित राहिला हे मीही मान्य करतो.मात्र,या समाजाला मी वेगळं कधीच मानलं नाही.नेहमी आपलंच मानलं असेही ठाकरे म्हणाले.

