दसरा मेळाव्याला हायकोर्टाची सशर्त परवानगी ः हस्तक्षेप याचिका फेटाळल्याने शिंदे गटाला धक्का
प्रतिनिधी/ मुंबई
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाने दावा केल्याने निर्माण झालेला गुंता अखेर हायकोर्टाच्या निर्णयाने सुटला आहे. न्यायालयाच्या आखाडय़ात झालेल्या युक्तीवादानंतर शिवतीर्थाचे मैदान उद्धव ठाकरे यांनी मारले आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपिठाने उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी मैदान वापरण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन नका, काही गोंधळ झाल्यास भविष्यात या मुद्यावर परवानगी नाकारली जाऊ शकते, असा इशाराही दिला. तर परवानगी नाकारणाऱया मनपा प्रशासनाच्या कारभारावरही ताशेरे ओढले.
या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ठरल्याचे सांगत तयारी लागा, रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवा, असे शिवसैनिकांना आवाहनही केले. तर न्यायालयाने दिलेला निकाल मान्य आहे, आम्ही सुप्रिम कोर्टात जाणार नाही, असे शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यापुढे शिवतीर्थासाठी खडाजंगी न होता ठाकरे गटाचा मेळावा, सुरळीत पार पडेल, हे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेचे दोन तर शिंदे गटाचा एक अर्ज
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवाजी पार्क मैदानवरील दसरा मेळावा कोणाचा होणार याबाबत वाद उफाळून आला. शिवसेनेच्यावतीने मेळाव्यासाठी मुंबई मनपा प्रशासनाच्या दादर उत्तर विभागामध्ये 22 ऑगस्टला आणि त्यानंतर 26 ऑगस्टला अर्ज दिला होता. तर शिंदे गटाचे दादर येथील आमदार सदा सरवणकर यांनी याचसाठी 30 ऑगस्टला अर्ज केला होता. मनपाकडून निर्णय होत नसल्याने शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर त्या याचिकेला आक्षेप घेणारी याचिका शिदे गटाच्यावतीने आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली.
खंडपीठाने शिंदे गटाची याचिका फेटाळली
दरम्यान मनपाने खऱया शिवसेनेचा निर्णय लागलेला नसल्याने आणि कायदा सुव्यवस्थेचे कारण सांगत दोनही गटाला परवानगी नाकारली. परिणामी शिवसेनेने नव्याने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुमारे पाच तास सुनावणी झाली. खंडपीठाने शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी सशर्त परवानगी दिली. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांना मेळाव्याचे चित्रीकरण करण्याचीही मुभा खंडपीठाने दिली आहे.
न्यायालयाने बजावले सर्वांनाच
शिवसेनेला परवानगी देताना न्यायालयाने कायदा आणि सुवव्यस्था राखण्यासंबंधी सर्वांनाच बजावले आहे. शिवसेना कोणाचा पक्ष हा मुद्दाही आता समोर नसल्याचे स्पष्ट करत ठाकरे गटाच्या युक्तीवादाशी सहमती दर्शवली. 2016 पासून मनपाने शिवसेनेला परवानगी दिली आहे. केवळ पोलिसांच्या अहवालावर परवानगी नाकारणे योग्य नाही, असे सांगत मनपाच्या कारभारावर ताशेरेही ओढले. त्याचबरोबर ठाकरे गटानेही गोंधळ निर्माण होणारी परिस्थिती निर्माण केल्यास भविष्यात या मुद्यावर परवानगी दिली जाणार नाही, असेही बजावले. पोलिसांनाही सूचना करताना या मेळाव्याचे चित्रकरण करण्याची मुभा दिली आहे.
ठाकरे गटाचा युक्तीवाद
ठाकरे गटाच्यावतीने ऍड. एस. पी. चिनॉय यांनी युक्तीवाद केला. ठाकरे गटाने प्रतिवर्षाप्रमाणे दोनवेळा परवानगीसाठी अर्ज केला आहे. शिंदे गटाने त्यानंतर अर्ज केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच स्थापनेपासून शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा असल्याचेही सांगितले. पोलिसांचा अहवाल गटबाजीतून आला असून त्यामुळे परवानगी नाकारणे योग्य नसल्याचा दावा केला. तसेच शिवसेना खरी कोणाची हा मुद्दाही आता नसल्याचे सांगितले. केवळ राजकीय कुरघोडी करण्यासाठीच याचिका केल्याचे सांगत याचिका फेटज्ञळण्याची विनंती केली.
पालिकेचा तांत्रिक मुद्यावर युक्तीवाद
शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असून ते शांतता क्षेत्रामध्ये येते. तसेच खेळाशिवाय मैदानाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. दोन गटातील वादामुळे पोलिसांनी उपस्थित केलेल्या कायदा- सुव्यवस्थच्या मुद्यावर दोन्ही गटाला परवानगी नाकरली असल्याचे मनपाच्यावतीने ऍड. मिलिंद साठे यांनी सांगितले.
शिदे गटाचा युक्तीवाद
खरी शिवसेना कोणती याचा वाद पेंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याची बाब उद्धव ठाकरे गटाने लपवल्याचा मुद्दा शिंदे गटाच्यावतीने उपस्थित करण्यात आला. अशा स्थितीत उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिल्यास ते या वादाच्या दृष्टीने चुकीचे ठरेल, असा दावाही केला.
तयारीला लागा, रेकॉर्ड ब्रेक गर्दी करा
दसरा मेळावा ही शिवसेनेची 56 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे परवानगी शिवसेनेला मिळणार हे सत्य होते. मात्र न्यायालयाने कोटय़वधी शिवसैनिकांच्या मनातला आवाज व्यक्त केला आहे. मेळाव्यासाठी नेहमीप्रमाणे जल्लोषात या, पण शिस्तीत या. या आनंदाला गालबोट लावू नका. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त करत तयारीला लागा, विक्रमी गर्दी करा, असे आदेश शिवसैनिकांना दिले.
सुप्रीम कोर्टात जाणार नाही ः संजय शिरसाट
ठाकरे गटाला हायकोर्टाने मेळावा घेण्याबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार अशी चर्चा होती. तथापि शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार नाही. परवानगीला आमचा विरोध नव्हता. आम्हाला परवानगी मिळावी हाच आमचा हेतू होता. न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असे स्पष्ट केले.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु ः देवेंद्र फडणवीस
शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवनागी न्यायालयाने दिली आहे. कोर्टाच्या आदेशांचे, नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. गृहविभाग आणि पालिका प्रशासन न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करेल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.