ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी निवडणूक आयोगाने घेतला. या निर्णयावर आक्षेप नोंदवत उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्व कागदपत्रे देऊनही निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याने ठाकरेंनी थेट निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ठाकरेंच्या या मागणीला भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची हकालपट्टी करावी, या उद्धव ठाकरेंच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. कारण निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची यापूर्वीची अर्थमंत्रालयातील कामगिरी संशयास्पद राहिली आहे.”
सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगाच्या बरखास्तीच्या मागणीला पाठिंबा देत एकाप्रकारे भाजपाला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे स्वामी यांचे हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
अधिक वाचा : श्रीकांत शिंदेंकडून मला मारण्याची सुपारी; राऊतांचं पोलीस आयुक्तांना पत्र