ऑनलाईन टीम/ तरुण भारत
यवतमाळमधील नेते माजी मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज हाती शिवबंधन बांधलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शनही केलं. यावेळी तुम्ही ठाण्यात सभा लावा मी आलोच म्हणून समजा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की सध्या माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण बोलणारा मी एक आणि ऐकणारे विद्यार्थी खूप आहेत. ज्या ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले तेव्हा शिवसेना दहापट मोठी होते, असा दावा त्यांनी यावेळी केला.
मी पोहरा देवीला मेळावा घ्यायचं जाहीर केलं आहे. आता मी ठाण्यात पण घेईल. हा आवाज बुलंद होत आहे. तुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा. कोणतंही शहर लोकप्रतिनिधींच्या शिवाय राहाणं योग्य नाही, असंही ते यावेळी म्हणाले. तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ‘काहीजण म्हणतात तुम्ही विनंती का केली नाही त्यांना. का करू विनंती? तुम्ही आम्हाला संपवायला निघाला. तुम्ही आडवे गेला नसता तर दसरा मेळावा सोपा झाला असता. आपण जिंकलेली जागा भाजपच्या पारड्यात टाकली. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं. मला कोणी संपवण्याची भाषा करणार असेल तर मी अजून चिडून कामाला लागतो, असा सूचक इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
हाती शिवबंधन बांधल्यानंतर संजय देशमुख म्हणाले, ‘उद्धव ठाकरे पोहरा देवीचं दर्शन घेणार आहेत. मोठी सभा साहेब तिथे घेतील. दिवाळी झाल्यावर साहेब सभा घेतील. ही सभा ऐतिहासिक होणार आहे. उद्धवजी ठाकरे यांची श्रद्धा तिथे आहे. येत्या काळात शिवसैनिक कायम उद्धव साहेबांसोबत राहणार आहे,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.