ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) पार्टनरचे कसाबशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे. तसेच ठाकरे कुटुंब नेमके कोणाकोणाचे पार्टनर आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. मुंबई हल्ल्यातील आरोपी व दहशतवादी अजमल कसाबसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध आहेत. हा हल्ला झाला तेव्हा पोलीस अधिकारी हेमंत करकरेंनी घातलेलं बुलेटप्रूफ जॅकेट बोगस होतं. करकरेंच्या मृत्यूसाठी बोगस बुलेटप्रुफ जॅकेट जबाबदार असून, या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा हा विमल अग्रवाल यांच्या कंपनीकडून होत होता. यशवंत जाधव यांच्यावरील धाडीनंतर विमल अग्रवाल यांचं नाव चर्चेत आलं होतं. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांचे विमल अग्रवाल यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
तसेच यशवंत जाधव हा उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे, त्यांनी 1000 कोटींची काळी माया जमवली आहे. मुख्यमंत्री ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी, पुत्र आदित्य आणि तेजस तसेच मुख्यमंत्र्यांचा मेहुणा पाटणकर हे नेमके कोणाकोणाचे पार्टनर आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.