संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद : मानवतेच्या विरोधातील गुन्हा
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
चीनच्या शिनजियांग प्रांतात उइगूर मुस्लीम हे क्रौर्याला बळी पडत असल्याचा खुलासा संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार आयोगाच्या अहवालाद्वारे करण्यात आला आहे. चीनमधील उइगूर मुस्लिमांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केले जातेय, कैद करून त्यांचा छळ केला जात असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
शिनजियांगमध्ये लोकांना कोठडीत ठेवले जात असून त्यांच्यावर बळजबरीने वैद्यकीय प्रक्रिया केल्या जात आहेत. याचबरोबर त्यांचे अवयव काढून ते विकले जात आहेत. या लोकांसोबत लैंगिक अत्याचार देखील होत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचा हा अहवाल यापूर्वीच प्रकाशित होणार होता. परंतु चीनने या अहवालाच्या प्रकाशनाला विरोध दर्शविला होता. हा अहवाल समोर येऊ नये म्हणून चीन जोरदार प्रयत्न करत होता. चीनचा विरोध झुगारून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
चीनमध्ये उइगूर आणि अन्य वांशिक अल्पसंख्याकांचे कायदेशीर हक्क हिरावून घेतले जात आहेत. चीन राजकीय कैदी अन् कार्यकर्त्यांना मनोरुग्णांच्या रुग्णालयात शिक्षा देत आहे. या लोकांना इलेक्ट्रिक शॉक देण्यात येत असून कित्येक महिन्यांपर्यंत त्यांना खोलीत बंद करून ठेवले जात असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
बळजबरीने नसबंदी
चीनचे अधिकारी डिटेंशन सेंटरध्ये अल्पसंख्याकांना कैद करून ठेवत आहेत. तेथे त्यांना बळजबरीने औषधे दिली जात आहेत. तसेच या लोकांवर नसबंदीची (कुटुंब नियोजन) शस्त्रक्रिया करत जन्मनियंत्रणाच्या पक्षपातपूर्ण धोरणांना लागू केले जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार आयोगाच्या आयुक्त मिशेल बाचेलेट यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या 13 मिनिटांपूर्वी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.