रशियाला आणखीन एक धक्का
पूर्व युक्रेनमधील डोनबासमध्ये युद्धाच्या 56 व्या दिवशी रशियाचे सैन्य सातत्याने हल्ले करत आहे. डोनबासवर पूर्णपणे कब्जा करण्यासाठी रशियाने आटोकाट प्रयत्न चालविला आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे सैन्य देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. युक्रेनच्या सैन्याने कारवाई करत मरिन्का शहराला रशियाच्या सैन्याच्या कब्जातून मुक्त करविले आहे. रशियाच्या सैन्याला याचबरोबर इजयूमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
डोनेट्स्क भागातील मरिन्का शहरावर पुन्हा नियंत्रण मिळविल्याचे युक्रेनच्या सैन्याकडून सांगण्यात आले. रशिया बेलारुसमधून सातत्याने स्वतःच्या सैन्याला युक्रेनमध्ये बोलावत असून तेथूनही हल्ले करत असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.
मागील 24 तासांमध्ये डोनबासमध्ये कब्जा करण्याचे 10 प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. युक्रेनच्या सैन्याने डोनबासमध्ये रशियाचे 12 रणगाडे, एक आर्टिलरी सिस्टीम, 28 चिलखती वाहने, सुखोई-34 विमान, केए-52 हेलिकॉप्टर, 4 डझेन आणि एक क्रूज क्षेपणास्त्र नष्ट केले आहे.
युक्रेनमध्ये मोठय़ा तीव्रेतच्या हल्ल्यानंतरही रशियाच्या सैन्याला फारसे यश लाभलेले नाही. रशियाच्या सैन्याला हवामान, रसद आणि तांत्रिक आव्हानांमुळे अडचणींना तोंड द्यावे लागतेय. रशियाचे सैन्य मारियुपोलवर पूर्णपणे कब्जा करण्यासाठी भीषण हल्ले करत आहे. तेथे युक्रेनचे सुमारे 3 हजार सैनिक एका विशाल स्टील प्रकल्पातून प्रत्युत्तर देत आहेत. रशियाच्या त्याच्या अपेक्षेनुसार यश मिळत नसल्याचा दावा ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
क्षेपणास्त्रs, हवाई हल्ले आणि तोफांनी युक्रेनमधील 1,200 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या सैन्याने डोनबास क्षेत्रात स्वतःचे नवे आक्रमण सुरू केल्याने आता रस्त्यांवर लढाई सुरू झाली आहे. रशियाने डोनबाससाठी लढाई सुरू केल्याचे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी काढले आहेत.
डोनबासमध्ये पूर्वी रशियाचे समर्थन करणारे 10 ते 20 हजार सशस्त्र सदस्य आहेत. तरीही रशियाच्या सैन्याला डोनबासवर कब्जा करणे अवघड ठरत चालले आहे. रशियाने मागील 24 तासांमध्ये स्वतःच्या सैन्यात आणखीन दोन तुकडय़ांची भर केली आहे. यामुळे युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याच्या 78 तुकडय़ा झाल्या आहेत. एका तुकडीत 700-800 सैनिक आहेत. म्हणजेच युक्रेनमध्ये 55-62 हजार रशियन सैनिक लढत आहेत. हे सर्व सैनिक दक्षिण आणि पूर्व युक्रेनमधील संघर्षात सामील आहेत. मागील आठवडय़ापर्यंत युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याच्या 65 तुकडय़ा संघर्षात सहभागी होत्या.
याचबरोबर डोनबासमध्ये रशियाचे समर्थन करणारे विदेशी भाडोत्री सैनिक देखील असून त्यांची संख्या 10-20 हजारांदरम्यान आहे. हे सर्व विदेशी सैनिक सीरिया आणि लीबियामधील आहेत.
पूर्व युक्रेनमध्ये मोडणाऱया डोनबास प्रांतातील बहुतांश लोकसंख्या रशियन भाषिक आहे. याचमुळे रशिया हा प्रांत ताब्यात घेऊ पाहत आहे. 2014 पासूनच या प्रांतात रशिया पुरस्कृत फुटिरवादी आणि युक्रेनच्या सैन्यादरम्यान संघर्ष सुरू आहे. डोनेट्स्क आणि लुहान्स्क शहरे याच प्रांतातील आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी पुतीन यांनी या दोन्ही शहरांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष कित्येक महिन्यांपर्यंत चालू शकतो असा इशारा ब्रिटनकडून देण्यात आला आहे. युक्रेनमधील स्थिती दयनीय असून पुतीन स्वतःच्या विजयासाठी निर्दोष नागरिकांचा बळी देत असल्याचे विधान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले आहे.