रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा : युक्रेनच्या 7 बंदराच्या ठिकाणी घडला प्रकार
युक्रेनच्या 7 बंदरांवर सध्या 70 हून अधिक विदेशी जहाजे उभी आहेत. सातत्याने होत असलेल्या बॉम्बवर्षावामुळे येथून जहाजांना बाहेर पडणे अवघड ठरले असल्याची माजहिती रशियाच्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरचे प्रमुख मिखाइल मिजिन्तसेव्ह यांनी दिली. रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान 70 हून अधिक विदेशी जहाजांना युक्रेनच्या बंदरांमधून बॉम्बवर्षावाचा धोका असल्याने बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे.
मिजिन्तसेव्ह हे रशियाच्या ह्युमॅनिटेरियन रिस्पॉन्स कोऑर्डिनेशन हेडक्वार्टर्स हाताळत आहेत. 18 देशांची एकूण 76 विदेशी जहाजे युक्रेनमधील सात बंदरे खेरसान, नोकोलायेव्ह, चेर्नोमार्सक, ओचाकोव्ह, ओडेसा, यूझनी आणि मारियुपोलमध्ये थांबून आहेत. स्वतःच्या जलक्षेत्रात कीव्हकडून होत असलेल्या बॉम्बवर्षावाचा धोका पाहता ही जहाजे बंदरांवरून परतण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर चालू महिन्याच्या प्रारंभी त्यांनी 60 हून अधिक जहाजे युक्रेनच्या बंदरांवर अडकून पडल्याचे सांगितले होते.
युक्रेनच्या जलक्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी रशियाच्या सैन्याकडून दररोज मार्ग उपलब्ध केला जात आहे. 18 देशांच्या जहाजांना कीव्हचे अधिकारी पुढे जाऊ देत नाहीत. याचबरोबर जहाजांवरील सदस्यांना गोळीबाराची धमकी देण्यात येत असल्याचा दावा असल्याचा दावा मिजिन्तसेव्ह यांनी केला आहे.
आण्विक युद्धाचा धोका अद्याप आहे. तिसरे महायुद्ध सुरू झाल्यास यात अण्वस्त्रs सामील होतील आणि हे विनाशकारी ठरेल असे विधान रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केले आहे. तर काही युक्रेनियन नागरिकांना रशियाच्या सैन्याला लूट करण्यासाठी श्रीमंत लोकांच्या घरांचा पत्ता दिला होता असे वृत्त समोर आले आहे.
अमेरिकेने युक्रेनला सोव्हियत काळाच्या 165 दशलक्ष डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. ब्रिटन युक्रेनच्या मदतीसाठी स्टॉर्मर चिलखती वाहने पाठविणार आहे. ही वाहने स्टारस्ट्रेक विमानविरोधी क्षेपणास्त्रांनी युक्त आहेत. तर 93 टक्के युक्रेनियन नागरिक आपले सैन्य रशियावर मात करणार असल्याचे मानत आहेत असे इन्फो सेपियन्स एजेन्सीच्या एका सर्वेक्षणात दिसून आले.
931 वसाहतींना करविले मुक्त
युक्रेनच्या सैन्याने 931 वसाहतींना रशियाच्या सैन्याच्या तावडीतून मुक्त करविले आहे. आम्ही आमची पूर्ण भूमी रशियाच्या सैनिकांकडून मुक्त करवून घेण्याचा दिवस आता फार लांब नसल्याचे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेत.
बुल्गारियाकडून मदतीचा पुढाकार
बुल्गारियाचे पंतप्रधान किरिल पेटकोव्ह यांनी युक्रेनच्या मदतीसाठी फंडरेजिंग प्रोग्राम (निधी जमविण्याचा कार्यक्रम) सुरू केला आहे. मी माझे वेतन दान केले असून स्वतःच्या देशवासीयांना देखील असेच करण्याचे आवाहन करत आहे. युक्रेनला सैन्य सहाय्य पाठविण्यासाठी राजनयिक तसेच सार्वजनिक एकतेची गरज असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.