भ्रष्टाचाराचे आरोप ः गुप्तचर प्रमुख किर्लो बुदनोव्ह यांना मिळणार पद
वृत्तसंस्था / कीव्ह
युद्धादरम्यान भ्रष्टाचाराला सामोरे जाणाऱया युक्रेनने आता स्वतःचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेजनिकोव्ह यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता युक्रेनचे सैन्य गुप्तचर प्रमुख किर्लो बुदानोव्ह यांची नियुक्ती केली जाणार आहे. अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्या पक्षाने यासंबंधी घोषणा केली आहे.
झेलेंस्की यांच्या सर्व्हंट ऑफ पीपल पार्टीचे प्रमुख डेव्हिड अर्खामिया यांनी टेलिग्रामद्वारे ओलेक्सी यांना पदावरून हटविण्याची माहिती दिली. युद्धादरम्यान युक्रेनचे संरक्षण मंत्रालय एखाद्या नेत्याऐवजी सैन्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीच्या हातात असावे असे त्यांनी म्हटले आहे.
खात्यात होणार बदल
ओलेक्सी रेजनिकोव्ह हे युद्ध सुरू होण्याच्या 3 महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये युक्रेनचे संरक्षणमंत्री झाले होते. ओलेक्सी रेजनिकोव्ह यांना आता अन्य मंत्रालयाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे झेलेंस्की यांच्या पक्षाचे प्रमुख डेव्हिड अर्खामिया यांनी सांगितले आहे. तर रेजनिकोव्ह यांनी आपण कुठलेच अन्य मंत्रालय स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कुणीच नेहमी पदावर राहू शकत नाही. झेलेंस्की यांच्या सूचनेचे मी पालन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयात भ्रष्टाचार
24 जानेवारी रोजी युक्रेनचे उपसंरक्षणमंत्री याचेस्लाव्ह शापोवालोव्ह यांना भ्रष्टाचाराशी निगडित एका प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला होता. याच घोटाळय़ामुळे आता ओलेक्सी रेजनिकोव्ह यांना पदावरून हटविले जात असल्याचे मानले जात आहे. परंतु ओलेक्सी यांच्यावर थेटपणे भ्रष्टाचाराचा कुठलाच आरोप झालेला नाही. युद्धादरम्यान संरक्षण मंत्रालयात झालेल्या घोटाळय़ामुळे जगभरात युक्रेनची प्रतिमा मलीन झाल्याचे मानले जात आहे, याचा फटका ओलेक्सी यांना बसला आहे.
उपसंरक्षणमंत्र्यांच्या निर्देशावर मंत्रालयाने अन्नसामग्री खरेदीचा करार तीनपट अधिक दरावर केला होता. स्थानिक बाजारपेठेत 15 रुपयांमध्ये मिळणारी अंडी 37 रुपयांच्या दराने खरेदी करण्यात आली होती. याचबरोबर अन्य अन्नसामग्री देखील महाग दरांवर खरेदी करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
15 अधिकारी बडतर्फ
अलिकडच्या काळात युक्रेनचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री भ्रष्टाचारामुळे अडचणीत आले आहेत. झेलेंस्की सातत्याने या मंत्र्यांचे राजीनामे मागत आहेत. मागील आठवडय़ात 15 अधिकाऱयांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर युक्रेनच्या डेप्युटी इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्टरलाही राजीनामा द्यावा लागला आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करत आहे, यात अनेक महत्त्वपूर्ण इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. अशा स्थितीत युक्रेन या इमारती पुन्हा उभ्या करू पाहत आहे. इमारती पुन्हा उभ्या करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या यंत्रसामग्रीच्या करारात 3 कोटी रुपयांहून अधिक लाच स्वीकारल्याचा आरोप मंत्री वॅसिल लोजिंस्की यांच्यावर झाला होता.