पिंपरी : भाजपने महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या महिल्या आमदार होण्याचा मान खापरे यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शहराला पहिल्यांदाच विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खापरे यांनी मोठी संधी दिली आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विधानपरिषदेवर निवडून येणार आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत खापरे यांचे नाव चौथ्या नंबरवर आहे. त्यामुळे त्या आमदार होणार हे निश्चित आहे. त्यांच्या निवडीवर 20 जून रोजी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान खापरे यांना मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड शहराला पहिल्यांदाच विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळणार आहे. शहराला चौथा आणि शहर भाजपला तिसरा आमदार मिळणार आहे.
पुण्यातील अनेकांना विधानपरिषदेचा आमदार होण्याची संधी मिळाली. परंतु, आजपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील एकालाही विधानपरिषदेचा आमदार होण्याची संधी मिळाली नव्हती. खापरे यांच्या रुपाने पहिल्यांदाच शहराला विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळणार आहे. उमा खापरे या भाजपच्या निष्ठावान आणि जुन्या पिढीतील कार्यकर्त्या आहेत. त्या सोनार समाजातून येतात. खापरे या पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन वेळा भाजपाच्या नगरसेविका होत्या. 2001-02 मध्ये त्या महापालिकेत विरोधी पक्षनेत्या देखील होत्या. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.