वार्ताहर/ उसगांव
कसयले तिस्क उसगांव येथील श्री महागणपती देवस्थान समितीतर्फे उसगांव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे यांचा सत्कार करण्यात आला. देवस्थानचे पुजारी व समिती सदस्य श्रीनिवास देसाई यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन उमाकांत गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष व उसगांव पंचायतीचे पंचसदस्य गोविंद रत्नाकर परब फात्रेकर, उपाध्यक्ष श्रीनिवास फात्रेकर, सचिव रामू सांगोडकर, खजिनदार संजू गावणेकर, सहखजिनदार घारसू पिळयेकर, सदस्य महेंद्र नाणशीकर, हरिश्चंद्र गावडे, संदीप झोरे, खास निमंत्रित पाहुणे समाजसेवक प्रणय पेडणेकर, उमाकांत गावडे यांचे खास मित्र अर्जुन गांवस, वसंत पाटील, महादेव गांवकर आदी उपस्थित होते. अर्जुन गांवस यांनी जुन्या आठवणांना उजाळा देताना सांगितले की, उमाकांत गावडे यांना समाजसेवेचे धडे बाल वयातच त्यांचे वडील स्व. महादेव व आई स्व. पार्वती यांच्याकडून मिळाले. घरातील आध्यात्मिक वातावरण व सुसंस्कारामुळे त्यांचे व्यक्तीमत्व नम्र व सुस्वभावी बनले. सकारात्मक दृष्टीकोन व सदोदीत इतरांना मदत करण्यात धन्यता मानणाऱया त्यांच्या परोपकारी स्वभावामुळे त्यांनी असंख्य मने जोडली आहेत. त्यांच्याकडे किती धन आहे हे महत्त्वाचे नसून मित्रांचा संचय मात्र त्यांचा खूप मोठा आहे. श्री महागणपती देवस्थान समितीचे एका उचित व्यक्तीचा सत्कार घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.
गोविंद परब फात्रेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात, उमाकांत गावडे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आहेत. दारावर मदतीसाठी आलेल्यांना रित्या हाताने पाठवायचे नाही हा त्यांचा स्वभाव बनला आहे. देवस्थान परिसरात भक्तगणांना बसण्यासाठी बाक, जनरेटर, खुर्च्या, ध्वनी यंत्रणा अशा प्रकारची मदत करून एक वेगळे नाते जोपासले आहे. नेहमीच सत्कार्य करणाऱया या व्यक्तीचा सत्कार घडवून आणताना देवस्थान समितीला खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना उमाकांत गावडे म्हणाले, आपले वडील स्व. महादेव गावडे यांनी केलेल्या संस्कारामुळेच समाजसेवेची आवड निर्माण झाली. अडल्या नडलेल्यांना शक्यतो मदत करीत गेलो व आज मागे वळून बघताना असंख्य मनाचे प्रेम लाभत असल्याने छाती गर्वाने फुगून येते. आई वडिलांचे संस्कार, पत्नी उर्मिला, पुत्र अक्षय, अनिश, अथर्व, सून सिद्धी यांच्या सहकार्यामुळेच समाजसेवेला वेळ देणे शक्य होते, असे सांगून सत्कारामुळे समाजाप्रती असलेल्या प्रेमाची जबाबदारी आणखी वाढल्याचे त्यांनी सांगितले. अजय बागकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर रामू सांगोडकर यांनी आभार मानले.