वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघामध्ये मोहमद शमीच्या जागी उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे. ही मालिका येत्या मंगळवारपासून सुरू होईल.
या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये मोहमद शमीचा समावेश करण्यात आला होता. पण शनिवारी रात्री घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत शमी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या समस्येमुळे शमीला आता या मालिकेला मुकावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ निवड समितीने शमीच्या जागी उमेश यादवची बदली खेळाडू म्हणून घोषणा केली.
भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज नवदीप सैनी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे सैनीच्या जागी ऋषी धवनची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे.
उमेश यादवने 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 सामन्यांच्या टी-20 मालिकेत आपला शेवटचा सहभाग दर्शवला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळताना त्याला दुखापत झाली होती. 2022 च्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता संघाकडून खेळताना त्याची गोलंदाजी बहरली होती. इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये मिडलसेक्स संघाकडून खेळताना रॉयल लंडन चषक स्पर्धेत त्याने दर्जेदार कामगिरी केली असून अ दर्जाच्या सात सामन्यात त्याने 16 गडी बाद केले आहेत.
भारत संघ- रोहित शर्मा (कर्णधार), के. एल.राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांडय़ा, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, बुमराह आणि उमेश यादव. भारत अ संघ- पृथ्वी शॉ, ए. ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), के. एस. भरत, कुलदीप यादव, शहबाज अहमद, राहुल चहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, ऋषी धवन आणि राज बावा.