वृत्तसंस्था/ लंडन
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला दुखापतीमुळे इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडावे लागत आहे. उमेशच्या मांडीचा स्नायू दुखावला असून ही दुखापत बरी होण्यास खूपच कालावधी लागणार आहे. या समस्येमुळे यादवला इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागत आहे.
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत तो मिडलसेक्स क्लबकडून खेळत असे. मिडलसेक्स आणि ग्लुसेस्टरशायर यांच्यात झालेल्या सामन्यात यादवला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो मिडलसेक्स संघाच्या अ गटातील होणाऱया ससेक्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. या स्नायु दुखापतीनंतर उमेश यादव तातडीने भारतात दाखल झाला. बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या या दुखापतीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सध्या उपचार करीत आहे. या उपचारानंतर उमेश यादव पुन्हा लंडनला जाणार नसल्याचे सांगण्यात आले. या समस्येमुळे उमेश यादवचे 2022 इंग्लिश कौंटी हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे.