विनापरवाना जाहिरात फलक हटविण्यासाठी कारवाई : फलक हटविण्याच्या मुद्यावरून दररोज नवीन वाद
बेळगाव : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात येवू नयेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. तरीदेखील अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम शुक्रवारी महसूल विभागाच्यावतीने राबविण्यात आली. पण जाहिरात फलक हटविण्याच्या मुद्यावरून दररोज नवीन वाद निर्माण होत आहेत. जाहिरात शुल्क आकारणीसाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. जाहिरात फलक लावण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र विनापरवाना जाहिरात फलक लावण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात येवू नये, अशी सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली होती. अनधिकृत जाहिरात फलक लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. पण महापालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. सध्या मोठमोठ्या जाहिरात फलकांसह बॅनर्स लावले जात आहेत. त्यामुळे जाहिरात फलक हटविण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या महसूल विभागामार्फत अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. शहर आणि उपनगरातील विविध भागात ही मोहीम राबवून जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली. पण काही राजकीय व्यक्तींच्या जाहिराती लावल्याने फलक हटविण्यावरून वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर पेच निर्माण होत आहे. पण आयुक्तांच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र फलक हटविण्यास विरोध करण्यात येत असल्याने मनपाच्या कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. कारवाईवेळी महसूल उपायुक्त प्रशांत हणगंडी, महसूल निरीक्षक एल. एच. बच्चलपुरी, अनिल बिर्जे. रवी मास्तीहोळीमठ, दोडमनी व इतर कर्मचारी उपस्थित होते.