वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
प्रतिनिधी/ डिचोली
डिचोली शहरातील काही भागांमध्ये लवकरच 32 कोटी रूपये खर्चून भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात येणार आहेत. तसेच साळ येथे उभारलेल्या नवीन वीज उपकेंद्राचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार आहे. लोकांची गरज लक्षात घेऊन सरकारने अतिरिक्त वीज खरेदीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी डिचोली येथे दिली.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी डिचोली येथे भेट देऊन डिचोली व मये मतदारसंघातील समस्येचा आढावा घेतला. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत, नीळकंठ सावंत, गंगू कुट्टीकर, रामचंद्र मुद्रस, विनोद धोंड, रामचंद्र च्यारी, झीलन शेख, वीज खात्याचे कनि÷ अभियंता, नगरसेवक, डिचोली व मयेचे मतदारसंघातील विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्यांची उपस्थिती होती.
गोवा राज्य हे झाडाझुडपांचे क्षेत्र आहे. या झाडांमधून वीज वाहिन्या गेल्या असल्याने पावसात या वाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्यास वीज पुरवठय़ावर अडथळा निर्माण होतो. राज्यात सर्व ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकाव्यात, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र संपूर्ण गोव्यात ही योजना राबविण्यासाठी किमान पाच ते दहा वर्षांचा कालावधी जाईल, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
वीजसेवेत सुधारणांसाठी सूचना कराव्या !
डिचोली व मये मतदारसंघातील विविध भागात असलेली वीजेची समस्या आपण आणि खात्याच्या अधिकाऱयांनी समजून घेतली आहे. या सर्व समस्या टप्प्या टप्प्याने सोडविण्यासाठी आपण व आपले खाते कटिबद्ध आहे. या खात्यात आणि वीजसेवेत सुधारणा करण्यासाठी लोकांनी वेळोवेळी सुचना कराव्यात. तसेच चांगल्या व सुरळीत सेवेसाठी सरकारच्या निर्णयांना समर्थन द्यावे, असे आवाहन यावेळी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
डिचोली मतदारसंघातील नगरपालिका विभाग सोडल्यास संपूर्ण मतदारसंघ ग्रामीण भागात विखुरलेला आहे. या भागांमध्ये वीजेची समस्या नित्याच्याच असतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी डिचोली उप वीजकेंद्रातील अभियंते आणि कर्मचारीही चांगले काम करते. परंतु त्यांना आवश्यक ती उपकरणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. डिचोलीत पेन ट्रक नाही. त्यामुळे लाईनमनना जीवावर उदार होऊन सिडीच्या साहाय्याने खांबांवर चढावे लागते. यासाठी डिचोली उप वीजकेंद्रासाठी अत्याधुनिक उपकरणे, पेन ट्रक देण्यात यावा, अशी मागणी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी यावेळी केली.
मयेतील वीजसमस्या सोडविण्यासाठी धोरण आखावे!
मये मतदारसंघाचा बहुतांश भाग वनराईने व्यापलेला असल्याने वीजसमस्या मोठी असते. झाडे हटविण्यासाठी तोडगा काढून जंगली भागातीलही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धोरण आखावे. चोडण बेटाला आलेली वीज जोडणी नेहमीच समस्या निर्माण करते, त्यावर उपाययोजना करण्यासाठी भूमीगत वीजवाहिनी टाकल्यास या गावातील समस्या सुटणार आहे. तसेच नार्वे भागातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याची मागणी मयेच आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली.
यावेळी डिचोली नगरपालिकेच्या नगरसेवकांनी, विविध पंचायतींच्या पंचसदस्य, सरपंच यांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. दोन्ही मतदारसंघातील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी खाते काम करणार, असे आश्वासन यावेळी मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी दिले.