जनसेनेची मागणी, वाहतूक अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /काणकोण
कोरोना महामारीच्या काळात मागच्या दोन वर्षांपासून काणकोण तालुक्यातील अंतर्गत मार्गांवरील खासगी बसेस बंद असून त्याचा परिणाम येथील सार्वजनिक वाहतुकीवर झालेला आहे. या बसेस तालुक्याच्या खोतीगाव, गावडोंगरी, आगोंद, लोलये, गालजीबाग, तळपणसारख्या अंतर्गत मार्गांवर धावत होत्या.
या बसेस बंद झाल्यानंतर सदर खासगी बसमालकांना नुकसानाचा सामना करावा लागला आहे. कित्येक जणांनी बसेस आपापल्या घराजवळ पार्क करून ठेवल्या आहेत. या बसेस पूर्ववत सुरू करण्याची मागणी जनसेनेच्या जनार्दन भंडारी आणि अन्य कार्यकर्त्यांनी काणकोणच्या विभागीय वाहतूक अधिकाऱयांची भेट घेऊन केली आहे आणि त्यासंबंधीचे निवेदन सादर केले आहे. सध्या शाळा रीतसर सुरू झालेल्या आहेत. संध्याकाळच्या सत्रात शालेय बालरथ चालू ठेवण्यात येत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना यापूर्वी अंतर्गत मार्गांवरून धावणाऱया खासगी मिनी बसेसचा लाभ व्हायचा. मात्र या मिनी बसेस बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी भंडारी यांनी केली आहे.