वॉशिंग्टन ः
अमेरिकेतील ऍरिझोना येथे बर्फाळ कालव्यात पडून तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हिमवर्षाव आणि हवामानातील गारठय़ामुळे कालव्यातील पाण्याचे बर्फात रुपांतर झाले होते. त्यावरून चालताना एकाच कुटुंबातील तीन जण बर्फात ओढले गेले. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना यासंबंधीची माहिती दिली. मात्र, वेळीच मदत मिळू न शकल्याने त्यांचा गारठून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून नारायण मुद्दन्ना (49), गोकुळ मेडिसेठी (47) आणि हरिथा मुद्दन्ना अशी त्यांची नावे आहेत. तलावातील एका भागात बर्फाचा थर कमकुवत झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 26 डिसेंबर रोजी ही घटना घडल्याचेही सांगण्यात आले.