क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
गडहिंग्लज येथे जीसीटीसीए आयोजित 12 वर्षाखालील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना संघाने सहारा क्रिकेट अकादमी इचलकरंजीचा 53 धावांनी पराभव करुन जीसीटीसीएस चषक पटकाविला. मोहम्मद अब्बासला सामनावीर तर समर्थ चौगुले याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 25 षटकात 7 बाद 196 धावा केल्या. त्यात समर्थ चौगुले 70, मोहम्मद अब्बास 42, अनिश तेंडुलकर 17, अतिथी भोगण 15 धावा केल्या. सहारातर्फे दर्शन 3 व पार्थ 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सहारा क्रिकेट इचलकरंजी संघाने 24.5 षटकात सर्व बाद 143 धावा केल्या. त्यात यश टेकेने 25, दर्शनने 22 व हर्षदने 20 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे हमजा 3, सुरज सक्री, अनिश तेंडुलकर व मोहम्मद अब्बास यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या युनियन जिमखाना संघाला व उपविजेत्या सहारा क्रिकेट इचलकरंजी संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक बक्षिसांमध्ये मोहम्मद अब्बास सामनावीर (जिमखाना), उत्कृष्ट फलंदाज शाहरुख धारवाडकर, उत्कृष्ट गोलंदाज मोहम्मद हमजा, होतकरु खेळाडू राजवर्धन मालवणकर, इम्पॅक्ट खेळाडू यश टेके व मालिकावीर समर्थ चौगुले यांना चषक देऊन गौरविण्यात आले.