क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
निपाणीत 12 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या युनियन जिमखाना संघाने आपले 4 साखळी सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. समर्थ चौगुले, सुरज सक्रिय यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सोमवारी झालेले दोन्ही सामने जिंकत युनियन जिमखानाने अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने सहारा इचलकरंजी संघाचा 47 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 25 षटकात 4 बाद 167 धावा केल्या. त्यात समर्थ चौगुलने 52 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सहारा संघाने 25 षटकात 7 बाद 120 धावाच जमवू शकला. त्यात यशने 43, अर्पणने 27 धावा केल्या.
दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने यजमान जीसीटीसीए ब संघाचा तब्बल 240 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 25 षटकात 3 बाद 296 धावा केल्या. समर्थ चौगुले याने शानदार शतक फटकावताना 100, मोहम्मद हमजा 58, शाहरुख धारवाडकर 48 तर अर्जुन येळूरकर 26 धावा केल्या. जीसीटीसीएतर्फे श्रेयशाने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल ब संघाचा डाव 14 षटकात 57 धावात आटोपला. युनियन जिमखानातर्फे सुरज सक्रीने 5 बळी मिळविले.