क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित हुबळी येथे सुरू असलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या युनियन जिमखाना संघाने उपांत्य फेरीत हुबळीच्या बलाढय़ श्री दुर्गा स्पोर्ट्स संघाचा 30 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू कामगिरी करणारा स्वरूप साळुंखे सामनावीर ठरला.
युनियन जिमखाना संघाने 30 षटकात 8 बाद 155 धावा केल्या. डावखुरा फलंदाज स्वरूप साळुंखेने 1 षटकार, 7 चौकारासह सर्वाधिक 47 धावा केल्या. हर्ष नाशिपुडीने 31, साईराज साळुंकेने 26, मीर मिरजीने 16, सुमित भोसलेने 13 धावा केल्या. श्री दुर्गातर्फे श्रेयस सक्रीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री दुर्गा संघाचा डाव 29 षटकात सर्व बाद 126 धावांत आटोपला. जॉयने 29 आणि आफ्रिदने 26 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे स्वरूप साळुंखेने 4, मीर मिरजी, नैतिक तेळवेकर व गौरव पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दरम्यान, युनियन जिमखानातर्फे लक्ष क्रिकेट अकॅडमी विरुद्ध साखळीतील शेवटच्या सामन्यात स्वरूप साळुंखेने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करताना चार षटकात एक धाव देत तब्बल आठ गडी बाद करण्याचा विक्रम केला.