शौर्य चोडणकर मालिकावीर, फरहान शेख सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित ताहीर सराफ पुरस्कृत झेवर गॅलरी चषक 11 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखाना संघाने गोव्याच्या दाभोळी क्रिकेट क्लब संघाचा अटीतटीच्या लढतीत 2 गडय़ांनी पराभव करुन पहिला झेवर गॅलरी चषक पटकाविला. फरहान शेख सामनावीर तर मालिकावीर शौर्य चोडणकर यांना गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर दाभोळी क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 7 बाद 96 धावा केल्या. शौर्य चोडणकर 21, पार्थ संकपाळ 19, विजय कळंगुटकरने 14 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे फरहान शेख 3 तर सुहास हिरेकुडी, अद्वैत पाटील व मोहम्मद हमजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 19 षटकात 8 बाद 97 धावा करीत सामना 2 गडय़ांनी जिंकून विजेतेपद पटकाविले. अष्टपैलू फरहान शेखने 31, अब्बास किल्लेदारने 17 तर अद्वैत पाटीलने 10 धावा केल्या. दाभोळी क्रिकेट क्लबतर्फे शौर्य चोडणकर 3 तर कविश परब व स्वप्नील नाईक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, स्पर्धा पुरस्कर्ते ताहीर सराफ, चंदन कुंदरनाड, गोव्याचे माजी रणजीपटू नारायण कांबळी, अजय चव्हाण, परेश मिस्कीन यांच्या हस्ते विजेत्या युनियन जिमखाना, उपविजेत्या दाभोळी गोवा संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अद्वैत पाटील उत्कृष्ट गोलंदाज, अदीप मिस्कीन उत्कृष्ट फलंदाज, स्पर्धेतील इम्पॅक्मट खेळाडू मोहम्मद हमजा, अंतिम सामन्यातील सामनावीर व उगवता खेळाडू फरहान शेख, मालिकावीर शौर्य चोडणकर यांनी वैयक्तिक बक्षिसे पटकावली. यावेळी मिलिंद चव्हाण, परशराम पाटील, सचिन साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल गवी व ज्योती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.