केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वींचे हज यात्रेकरूंना आवाहन
मुंबई, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखविला. भारतातील हज यात्रेकरूंनी संपूर्ण जगाच्या शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन नक्वी यांनी याप्रसंगी केले. 207 पुरुष आणि 203 महिलांसह 410 यात्रेकरूंची पहिली तुकडी मुंबई विमानतळावरून प्रवास करत आहे. मुंबईतून सुमारे 8,000 जण 19 विमानांमधून हज यात्रेला जाणार आहेत.
हज 2022 साठी उड्डाणे सुरू झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नक्वी यांनी दिली. हज यात्रेकरू अहमदाबाद, बेंगळूर, कोचीन, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि श्रीनगर या दहा केंद्रांवरून रवाना होणार आहेत. हज यात्रेकरूंच्या चांगल्या सोयीसाठी 100 टक्के डिजिटल/ऑनलाईन प्रक्रियेसह हज यात्रा यशस्वीपणे केली जात आहे. यात्रेकरूंना डिजिटल हेल्थ कार्ड, ई-मसिहा आरोग्य सुविधा आणि ई-गुड्स प्री-टॅगिंग, निवास आणि वाहतुकीची माहिती यासह अनेक ऑनलाईन सुविधा देण्यात आल्या आहेत. यावषी किमान 79,237 भारतीय मुस्लीम हजला जाणार असून त्यापैकी जवळपास 50 टक्के महिला आहेत. हज यात्रेकरूंची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन करण्यात आली आहे.